परभणी,दि 06 ः
“चकवाचांदण हे केवळ आत्मचरित्र नाही, तर अरण्याच्या गूढतेचा, निसर्गाच्या अद्भुततेचा आणि संशोधनाच्या अथक झगड्याचा भाषिक आविष्कार आहे. हे पुस्तक नव्हे, तर वनाचा श्वास आहे,” अशा प्रभावी शब्दांत साहित्यिक माणिक पुरी यांनी मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा सखोल परामर्श घेतला.
शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, परभणी आयोजित ‘… आणि ग्रंथोपजीवीये’ या साहित्यिक उपक्रमांतर्गत “एक दिवस : एक पुस्तक” या मालिकेतील पहिले पुष्प म्हणून ‘चकवाचांदण – एक वनोपनिषद’ या ग्रंथावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भिमराव खाडे होते, तर प्रमुख उपस्थिती विठ्ठल भुसारे यांची लाभली.
माणिक पुरी पुढे म्हणाले, “चितमपल्ली सर हे केवळ पक्षीतज्ज्ञ किंवा वनाधिकारी नव्हते, तर ते एक ऋषितुल्य संशोधक होते. त्यांनी दुर्गम जंगलांत जाऊन, पारधी आणि आदिवासी समाजातील लोकांशी संवाद साधून दुर्मिळ माहिती संकलित केली. संशोधनासाठी त्यांनी संस्कृत, पाली, इंग्रजी, जर्मन, रशियन, बंगाली, प्राकृत अशा अनेक भाषा शिकून रामायण, महाभारत, अठरा पुराणे, वेद, उपनिषदे यांसारख्या ग्रंथांचा पक्षीदृष्टीकोनातून अभ्यास केला.”
त्यांनी नमूद केलेल्या काही विस्मयकारक निरीक्षणांमध्ये:उंदीर चोरीसाठी वापरणे, माकड आणि अस्वल लाडू तयार करतात, कबुतर गुहेत शेकडो किलो धान्य साठवतात, म्हातारे हत्ती आत्महत्या करतात या आणि अशा अनेक अकल्पित व्यवहारांचा शब्दचित्ररूप आढावा ‘चकवाचांदण’मध्ये पाहायला मिळतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी डॉ. केशव खटिंग यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी अतिशय नेमकेपणाने पार पाडले. आभार प्रदर्शन बाळू बुधवंत यांनी केले.
कार्यक्रमात अमोल देशमुख, बबन आव्हाड, विजय ढाकणे, गणेश कुरा, गंगाधर गायकवाड, हनुमान व्हरगुळे, मारोती डोईफोडे, भानुदास धोत्रे, त्र्यंबक वडसकर, अनया ढाकणे आणि अर्चना पौळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राजीव गांधी विद्यालय, समाधान कॉलनी, परभणी येथे सायंकाळी सहा वाजता पार पडलेला हा कार्यक्रम अनेक रसिक साहित्यप्रेमींसाठी एक स्मरणीय अनुभव ठरला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता काकडे, दयानंद कदम, मनोज वाघमारे, दिपक परभणीकर, सुनील पवळे, नागेश शिंदे, अलका जगताप,आशा रासवे, मुक्ता सावंत, आदींनी प्रयत्न केले.