दोन दशकानंतर शिवाजीराव आढळरावांची घरवापसी

0 24

शिवसेनेचे नेते, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (मंगळवारी) आज अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिरूरची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने आढळरावांनी मनगटावरील शिवबंधन न सोडता घड्याळ चढवलं आहे. सुमारे दोन दशकानंतर आढळरावांनी घरवापसी केली आहे.

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे आज मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत अंतिम झाली असून मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी आढळराव पाटील हे अमोल कोल्हेंना टक्कर देतील. आज आढळराव पाटील व त्यांच्या मोजक्याच कार्यकर्त्यांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश झालेला आहे. त्यांच्या उमेदवारीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या बैठकीत आढळराव यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला. आढळराव यांचा ‘राष्ट्रवादी’मध्ये प्रवेश होताच त्यांना शिरूरची उमेदवारी जाहीर झाल्यास शरद पवारांसोबत असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आढळराव अशी ‘राष्ट्रवादी’ विरुद्ध ‘राष्ट्रवादी’ लढत होईल. मागील निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे कोल्हे यांनी शिवसेनेचे खासदार आढळराव यांचा पराभव केला होता.

आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील आणि देवेंद्र शहा यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र ज्यावेळी २००४ चा निवडणुकीत आढळराव पाटील यांना खेड मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यावेळी आढळराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २००४ साली मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले होते.

error: Content is protected !!