शरद पवारांचं भोजनाचं निमंत्रण शिंदे-फडणवीसांनी नाकारलं

1 94

शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना बारामतीतील गोंविदबाग निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रण दिलं होतं. शरद पवार यांच्या स्नेहभोजनाच्या निमंत्रणानंतर राज्यभरात चर्चेचा हा विषय बनला होता. शरद पवारांच्या पत्रानंतर निवासस्थानी स्नेहभोजनसाठी यायला जमणार नाही, असा संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे कळविला आहे.

शरद पवार यांनी काल गुरुवारी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण दिलं होतं. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीत कार्यक्रमानिमित्त येणार असल्याने शरद पवारांनी स्नेहभोजनासाठी निमंत्रण दिलं होतं. शरद पवारांनी पत्रासहित दुरध्वनीवरूनही निमंत्रण दिलं. शरद पवारांच्या निमंत्रणानंतर इच्छा असूनही येऊ शकणार नाही, असं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलं आहे .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रात काय म्हटलं?

मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रात म्हटलं की, ‘आपले २८ फेब्रुवारीला पत्र मिळाले. आपण निवासस्थानी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केल्याबद्दल आभारी आहे. परंतु पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे इच्छा असून येऊ शकणार नाही याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. भविष्यात नक्कीच आपल्याकडे भोजनाचा योग येईल असे मला वाटते. पुन्हा एकदा निमंत्रणाबद्दल धन्यवाद’.

देवेंद्र फडणवीसांनी पत्रात काय म्हटलं?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं की, ‘आपलं पत्र मिळालं. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन आहे.

‘त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ आहे. उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही. आपले पुनश्चः एकदा आभार, असेही फडणवीस म्हणाले.

error: Content is protected !!