12/04/26
Breaking News

सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू दि१२
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या संकल्पनेतील महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेस तालुक्यातील १२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते पदव्युत्तर या तीन गटात शहरातील नूतन विद्यालयात रविवार ( दि. १२) रोजी आयोजित तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागिय पोलिस अधिकारी दिपककुमार वाघमारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी उदय जाधव, पोलिस निरीक्षक दिपक बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोडगे,उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार, पंचायत समितीचे सभापती पप्पू डोंबे, सर्जेराव लहाने, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, बाबासाहेब पावडे यांची उपस्थिती होती.

आपले जीवन भविष्य उज्वल होईल असे विचारधन महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्वच महापुरुषांनी दिले आहे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करून आपल्या जीवनाची वाटचाल केली तर त्यांचे जीवन समृद्ध होईल. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन, अभ्यासातून आपला व्यक्तिमत्त्व विकास करावा. असे प्रतिपादन तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचे उद्घाटक उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांनी केले.

‌विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम, ज्ञान संपादन आणि शिक्षणातून आईवडील, स्वतःचे आणि सेलूचे नाव मोठे करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा उपक्रम स्तुत्य आहे. विचार उत्सवातून महापुरुषांना केलेले अभिवादन आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागते. विद्यार्थी पुस्तक, वर्तमानपत्र वाचनाकडे वळतात. अशा स्पर्धा परीक्षेतूनच भविष्यातील अधिकारी घडतात. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी दिपककुमार वाघमारे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुबोध काकडे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सिध्दार्थ एडके, गंगाधर अवचार, सुमेध आवटे, गजानन साळवे, डॉ. सुरेश हिवाळे,डॉ. शरद ठाकर, रुपेश भोवते, राजेश कान्हेकर, प्रकाश भालेराव, रमेश मरेवार, काशिनाथ पांचाळ,रानखांब, बाबुराव साबणे, मुक्तीराम वाव्हळे, संतोष बोरकर, अभिमान पाईकराव, दीपक सोनकांबळे, बालासाहेब पंडित, तानाजी भोसले, सुनील राठोड,तिरुपती गडंबे,, उद्धव कंठाळे, प्रदीप कांबळे, सुनील मोरे, संजीवकुमार घोंगडे यांनी परिश्रम घेतले.

Check Also

राणीसावरगाव येथील केदारेश्वर महादेव मंदिराचा दुर्मिळ दानशिलालेख

गंगाखेड प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या मौजे राणीसावरगाव …