परभणी,दि 09 ः
बालकांच्या पहिल्या सहा वर्षातील बुद्धीचा विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोषण पंधरवडा अभियानाचा शुभारंभ परभणी जिल्हा परिषद येथे उत्साहात करण्यात आला.
गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद परभणी येथील सभागृहामध्ये महिला व बालविकास सभापती ऐश्वर्या अजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा क) रेखा काळम, अजय चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पोषण पंधरवडा अभियान शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) जिल्हा समन्वयक, जिल्हा सहाय्यक यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
दिनांक 9 ते दिनांक 23 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये पोषण पंधरवाडा या अभियानाचे व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत लहान मुलांना नो स्क्रीन आवर, स्थानिक पौष्टिक पाककृतींचे प्रात्यक्षिक, बालिका पंचायत, पोषण पे चर्चा, आजी-आजोबांच्या गोष्टी यासारखे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम यांनी दिली. तसेच सर्वांनी पोषण पंधरवड्यात वैशिष्ट्यपूर्ण काम करून परभणी जिल्ह्याचा महाराष्ट्रात अव्वल क्रमांक आणण्या बाबत आवाहन केले.
यावेळी पोषण आहारामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पर्यवेक्षिकांचा गौरव मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
..
जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी (सा.) अंगणवाडी सेविका यांनी सक्रिय सहभाग नोंदवून पोषण पंधरवडा अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करावी.
ऐश्वर्या अजय चव्हाण
सभापती, महिला व बाल विकास विभाग,
*****
………..
सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष अंगणवाडीला भेटी द्याव्यात. जेणेकरून अंगणवाडी मधील अडीअडचणीची सोडवणूक करता येऊ शकेल तसेच पोषण पंधरवडा अभियान अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत.
रश्मी खांडेकर
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
Shabdraj www.shabdraj.com