पुणे : शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील वॉटरपार्कमध्ये व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना घडली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकडे दु्र्लक्ष केल्याने वॉटरपार्कमध्ये एका महिलेचा भीषण अपघात झाला आहे. अश्विनी संदीप नप्ते (वय 37, रा. करंदी) असे या महिलेचे नाव असून या अपघातात त्यांचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी नप्ते या आपल्या कुटुंबासह सुटीचा आनंद घेण्यासाठी मोराची चिंचोली येथील जय मल्हार पर्यटन केंद्रात गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या वॉटर स्लाइडवरून खाली येत असताना, स्लाईड संपते तिथे पाण्याची पातळी अत्यंत कमी होती. त्यामुळे पाण्याचा आधार न मिळाल्याने अश्विनी या थेट जमिनीवर जोरात आपटल्या आणि जागीच बेशुद्ध पडल्या. या भीषण आघातामुळे त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर पर्यटन केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. इतक्या मोठ्या पर्यटन केंद्रात कोणतीही तातडीची वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. अखेर नातेवाईकांनी स्वतः खासगी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी अंती धक्कादायक खुलासा केला की, अश्विनी यांच्या पाठीचे चार मणके तुटले असून त्यांच्या शरीराचा खालचा भाग आता कधीही हालचाल करू शकणार नाही.
एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी किरण नप्ते यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात पर्यटन केंद्राचे मालक आणि व्यवस्थापकांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ नफेखोरीसाठी पर्यटकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा केंद्रांवर कडक कारवाई करा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. अपघात झाला त्यावेळी सुरक्षाव्यवस्था , मार्गदर्शन किंवा खबरदारीचे उपाय नव्हते, असेही नातेवाईक म्हणाले.
Shabdraj www.shabdraj.com