परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा ११ वर्षांचा यशस्वी प्रवास साजरा करण्यासाठी भाजपा परभणी महानगर कडून परभणी मध्ये एक प्रोफेशनल मीट उत्साहात पार पडली.
कार्यक्रमास भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी उपस्थित राहून देशातील सामाजिक व आर्थिक बदलांवर प्रकाश टाकला. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, “मागील ११ वर्षांत गरीब कल्याण, आदिवासी विकास आणि तंत्रज्ञान आधारित शासन यात भारताने जगाला दिशा दाखवली आहे.”
या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या ऐतिहासिक सुधारणा व निर्णयांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉक्टर व आरोग्य क्षेत्रासाठी आयुष्मान भारत योजना, डिजिटल हेल्थ मिशन, वकिलांसाठी ई-कोर्ट्स प्रकल्प, न्यायालयीन प्रक्रियेतील डिजिटल सुधारणांची माहिती, विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेत प्रत्येक प्रोफेशनल वर्गाचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित करण्यात आले.
या प्रसंगी शहरातील डॉक्टर, अभियंते, अधिवक्ते, व्यापारी, उद्योजक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले योगदान देण्याची कटिबद्धता व्यक्त केली. कार्यक्रमाची सांगता देशभक्तिपूर्ण वातावरणात आणि “विकसित भारतासाठी सर्वांनी एकत्र येऊया” या निर्धाराने झाली.