परभणी,दि.04(प्रतिनिधी) : स्वराज्य ट्रेकर्सच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांतातील सर्वात उंच किल्ला साल्हेर तसेच सालोटा, मुल्हेर, मोरा, मानगड व हरगड या खडतर गडांची गिर्यारोहण मोहीम नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. मोहिमेत परभणीतील उत्साही गिर्यारोहक सहभागी झाले.
ही मोहीम साहाय्यक निबंधक माधव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व गुलाब गरुड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. शनिवारी पहाटे साल्हेर किल्ल्याची चढाई सुरू झाली. दुपारपर्यंत हा अत्यंत कठीण किल्ला सर करत मोहिमेतील सदस्यांनी गडमाथ्यावर ध्वज व फलक फडकावले. यावेळी दिवंगत कृषिमित्र विजय सावंत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दुसर्या दिवशी अधिक अवघड मानला जाणारा मुल्हेर गड यशस्वीरीत्या सर करण्यात आला. त्यानंतर मोरा, मानगड व हरगड गडांवर विजय मिळवत मोहिमेची सांगता झाली. गड सर करताना भारत माता की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा जोशपूर्ण घोषणा देत गिर्यारोहकांनी उंच शिखरांवर भारताचा तिरंगा फडकावला. फलकांच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देण्याचा उपक्रमही राबविण्यात आला.
या आव्हानात्मक मोहिमेत मेजर केशव मुंढे, प्रदीप धर्मशेट्टी, रणजित कारेगांवकर, विष्णू मेहत्रे, विशाल गरुड, शिवाजी कदम, पांडुरंग चव्हाण, देवानंद शेटे आदी गिरिप्रेमींनी सहभागी होत मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित…
परभणीतील विज्ञान व खगोलशास्त्राच्या अध्ययनासाठी कार्यरत असलेल्या परभणी अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरा, ज्ञानाचे नवे विश्व उभारा’ असा संदेश देणारा फलक गडमाथ्यावर फडकविण्यात आला. तसेच पर्यावरण संवर्धनासंदर्भात झाडे लावा, झाडे जगवा, करा वृक्षांचे संगोपन, होईल सुखकर वन्यजीवन असे संदेश देऊन संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
Shabdraj www.shabdraj.com