30/06/25
Breaking News

लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर.. शून्य टक्के व्याजदराने मिळणार कर्ज

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या अटी आणि शर्तींच्या कचाट्यात अडकली आहे. निवडणूक काळात पडताळणी न करता सरसकट लाभ दिल्यानंतर आणि त्याचा अमाप बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडल्यानंतर सरकारने हळूहळू पडताळणी सुरू करून त्या माध्यमातून आधी पात्र असलेल्या लाडक्या बहि‍णींना नंतर अपात्र ठरवले. यामुळे लाडक्या बहिणींसह विरोधकांच्या मोठ्या टीकेला राज्य सरकारला सामोरे जावे लागले. मात्र यावर उतारा म्हणून लाडक्या बहि‍णींना खूश करण्यासाठी भाजप विचारांची सत्ता असलेल्या आणि प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या मुंबै बँकेने लाडक्या बहि‍णींना १ लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.
भारतीय जनता पक्षासह महायुतीला लोकसभा निवडणुकीत जोरदार फटका बसला. महाराष्ट्रातील ४२ खासदारांच्या संख्येची गाडी अगदी १७ खासदारांवर घसरली. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा करून तसेच त्याची अंमलबजावणी करून महायुतीने बहि‍णींचा विश्वास संपादन केला. या सगळ्याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाला. तब्बल २३० जागा मिळवून महायुतीने ऐतिहासिक यश संपादन केले. परंतु लाखो महिला योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये बसत नसतानाही सरकारने निवडणुकीतील फायद्यासाठी त्यांना लाभ दिला. निवडणूक सरताच पडताळणी सुरू केल्याने बहि‍णींच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागत आहे. यावरच आता भाजप विचारांच्या मुंबै बँकेने उतारा शोधला आहे.महिलांना उद्योग व्यवसाय केले पाहिजेत, हे डोळ्यासमोर ठेवून मुंबै बँकेने कर्जधोरण आणले .राज्य सरकारच्या 4 महामंडळाच्या योजनांतून १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थ्यांना दिला जातो. पर्यटन महामंडळाच्या आई योजनेतून महिलांना 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो. तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठी असलेले महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून मिळत असलेल्या व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. त्यामुळे, आम्ही ज्या महिलांना कर्जपुरवठा करत आहोत, त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील, तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते, असे बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

Check Also

1500 रुपये कधी मिळणार….लाडक्या बहिणींचं लक्ष

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. या योजनेच्या …