11/07/25
Breaking News

सावधान.. एक चूक आणि अकाउंट रिकामं, SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट

तुम्हाला जर तुमच्या घरातून किंवा जवळच्या व्यक्तीचा अथवा मित्र मैत्रिणीचा फोन आला, मी संकटात आहे मला मदत कर, पैशांची खूप गरज आहे, लगेच पाठवू शकतेस का असं सांगणारा, तर तुम्ही एकदम घाबरून जाल, पटकन तिला मदत करण्यासाठी म्हणून पैसे पाठवायला जाल, पण थांबा, तुमची हीच चू महागात पडू शकते. तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा घरच्यांना खरंच पैशांची गरज आहे का हे क्रॉस चेक करा. नाहीतर तुम्ही घाईगडबडीत त्यांना पैशांची मदत करायला जाता जाता तुमचं बँक खातं कधी रिकामं होईल सांगता येणार नाही. होय तुम्ही जे वाचताय ते अगदी खरंच आहे. तुमच्यासोबतही हे घडू शकतं. यासाठीच बँकेनं ग्राहकांना अलर्ट करणारं ट्विट केलं आहे.
हॅकर्स तुमच्या साधेपणाचा फायदा घेतात

सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीचा नवा मार्ग शोधला आहे. तो म्हणजे आवाजाची नक्कल करणे किंवा ‘व्हॉईस क्लोनिंग’ (Voice Cloning). तंत्रज्ञानाच्या मदतीने हॅकर्स आता एखाद्या व्यक्तीचा आवाज हुबेहूब कॉपी करून, त्या आवाजात फोन करून लोकांना गंडा घालू लागले आहेत. व्हाईस क्लोनिंगच्या मदतीनं वेगवेगळ्या कारणाने गंडा घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे तुम्ही सावध आणि अलर्ट राहाणं गरजेचं आहे.
कोणतीही माहिती देण्याआधी सावधान!

तुम्हाला पैशांची मागणी करणारे किंवा वैयक्तिक माहिती विचारणारे अनपेक्षित कॉल आल्यास आता अधिक सावध राहण्याची गरज आहे. आवाजाची नक्कल करून तुमची फसवणूक केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, संशयित कॉल्सवर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः, जर कोणी तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा आवाज वापरून पैशांची किंवा गोपनीय माहितीची मागणी करत असेल, तर तात्काळ पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कुठे करायची तक्रार?

जर असा प्रसंग तुमच्यासमोर आलाच तर तुम्ही घाबरुन न जाता आधी फोन कट करा. तुमच्या जवळच्या व्यक्तीला त्याच्या ओळखीच्या नंबरवरुन पुन्हा फोन करुन खरंच अशा प्रकारची गरज आहे का ते विचारा. हॅकर्सनी व्हॉईस क्लोनिंगसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे आवाजातील फरक ओळखणे फार कठीण झालं आहे. तुम्ही त्याला फसलात तर तुमची आयुष्यभराची कमाई गेलीच म्हणून समजा. त्यामुळे जास्त अलर्ट राहाणं गरजेचं आहे.