सेलू ( प्रतिनिधी )
विद्यार्थ्यांनी एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्नशील राहावे व सर्वांशी माणूसकीने वागावे. प्रगतीपुस्तकावरील गुणासोबतच अंगातील सदगुण देखील तेवढेच महत्वाचे आहेत .त्यासाठी गुणवत्तेसोबच विद्यार्थी संस्कारक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत .असे विचार निवृत्त वनाधिकारी टी के कुलकर्णी यांनी नूतन संस्थेच्या वर्धापन दिन प्रसंगी व्यक्त केले
येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८६ वा वर्धापनदिन व श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिनानिमित्त नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात संस्थेतील प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, पदवी, विविध शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविलेले गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंचा सत्कार उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह पुरस्कार, पी.एचडी पदवी प्राप्त प्राध्यापक, शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया होते. तर संस्थेचे माजी विद्यार्थी नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश मंत्री ( परभणी ) हे प्रमुख पाहुणे म्हणून तर निवृत्त वनाधिकारी टी. के. कुलकर्णी ( सेलू ) यांची विशेष उपस्थिती होती.
व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, कार्यकारिणी सदस्य सिताराम मंत्री, प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मोगल, मुख्याध्यापिका निशा पाटील, सुखानंद बेंडसुरे यांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थी स्वराजचे पालक लक्ष्मण जाधव, विद्यार्थीनी स्वरा लाटकर यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले. संस्थेचा वार्षिक अहवाल सहसचिव जयप्रकाश बिहाणी यांनी सादर केला. पाहुण्यांचा परिचय कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी दिला. एन.पी. पाटील, अनिल रत्नपारखी, कीर्ती राऊत यांनी यादीचे वाचन केले. सूत्रसंचालन अशोक लिंबेकर यांनी केले. बाबासाहेब हेलसकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, घटक संस्था प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ यशस्वीतेसाठी संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.