30/06/25
Breaking News

भाजपा मिळणार नवे प्रदेशाध्यक्ष..एकच आला अर्ज

भारतीय जनता पक्षाला लवकरच नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी आता प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. यासाठी रविंद्र चव्हाण यांनी आपला अर्ज केंद्रीय निरीक्षक किरेन रिजुजी यांच्याकडे दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. 1 जुलै रोजी संध्याकाळी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे राज्य मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. भाजपच्या वतीने त्या दृष्टिकोनातून सर्व पावले देखील उचलण्यात येत होती. रवींद्र चव्हाण यांच्याच नेतृत्वातच अनेक पक्षप्रवेश राज्यात होत आहेत. आता रवींद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला असून, यांच्या अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तीची घोषणा एक जुलै रोजी होणार आहे.

रवींद्र चव्हाण कोण आहेत?

रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 2009 पासून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अलीकडच्या निवडणुकीत तब्बल 50 हजारांहून अधिक मताधिक्य मिळवत विजयी झाले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.

रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने 2002 साली कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. 2005 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते. 2007 मध्ये ते स्थायी समितीचे सभापती झाले. 2009 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवले आणि मोठा विजय देखील मिळवला. त्यानंतर 2016 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची हॅटट्रीक पूर्ण केली.

Check Also

लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर.. शून्य टक्के व्याजदराने मिळणार कर्ज

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या अटी आणि शर्तींच्या कचाट्यात अडकली …