28/02/26
Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईतल्या वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली.

गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी मुंबईतल्या वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये सर्वानुमते सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा पावारांच्या खंबीर नेतृत्वाचं कौतुक केलं.दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याची चर्चा मागच्या महिन्याभरापासून सुरु होती. अखेर गुरुवारी सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर विराजमान झाल्या आहेत.

सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हातात घ्यावीत, असे पक्षातील अजित पवार यांच्या समर्थक आमदारांचे म्हणणे होते. तर प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड व्हावी, यासाठी काही आमदारांना तयार केले गेले होते, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. परंतु पवारांच्या पक्षाचा पवारच अध्यक्ष व्हावा, अशी सूचना दिल्लीतून आल्याने अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून पटेल यांचे नाव आपोपाप मागे पडले. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पवार कुटुंबामागे सहानुभूती आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्रे हातात घ्यावीत, त्याचा पक्षाला फायदा होईल तसेच पक्षातील लोकप्रतिनिधी एकसंध राहतील, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे होते. पक्षातील सर्वांच्या विनंतीला मान देऊन सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली.

Check Also

मुख्यमंत्री सोडुन संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा..

 ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्राशेजारील गुजरातमध्ये राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे.   गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल …