13/04/26
Breaking News

देशभर चर्चा, पण तरीही आपची राघव चड्डांवर कारवाई;

आम आदमी पार्टीने  राज्यसभेत मोठा संघटनात्मक बदल करत सर्वांनाच धक्का दिला आहे. पक्षाचे तरुण आणि आक्रमक चेहरा मानले जाणारे राघव चड्डा यांना राज्यसभेतील ‘उपनेते’ पदावरून तडकाफडकी हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी अशोककुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, राघव चड्डा यांची हकालपट्टी का झाली? याबाबत आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

राघव चड्ढा यांची गच्छंती होण्यामागे केवळ ‘प्रशासकीय प्रक्रिया’ नसून पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. दिल्लीतील कथित मद्य धोरण हा ‘आप’साठी सर्वात संवेदनशील मुद्दा होता. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर संपूर्ण पक्ष जल्लोष करत होता. मात्र, राघव चड्डा यांनी या महत्त्वपूर्ण विजयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. ही बाब पक्षनेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना खटकल्याचे बोलले जात आहे.

 राघव चड्डा पीआर वाढवत असल्याची चर्चा

स्वाती मालिवाल प्रकरणावेळी राघव चड्डा यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेसोबत राहण्याऐवजी या वादापासून स्वतःला दूर ठेवले होते. राघव चड्ढा यांनी संसदेत मध्यमवर्गीयांचे प्रश्न, मोबाइल रिचार्ज ‘स्कॅम’, झोमॅटो-स्विगीचे दर आणि जीएसटी सारखे विषय प्रभावीपणे मांडले. यावरून सोशल मीडियावर त्यांची मोठी चर्चा झाली. मात्र, पक्षात अशी चर्चा आहे की, चड्डा हे पक्षाच्या अजेंड्यापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक ‘पीआर’  आणि ब्रँडिंगवर जास्त लक्ष देत चर्चा रंगली आहे. तसेच, पक्षाच्या कामातही राघव चड्डा यांचा कमी सहभाग असल्याने त्यांच्यावर पक्षातील नेते नाराज असल्याचे समजते. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना या गोष्टी खटकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 उपनेते पदावरून हटवल्यानंतर राघव चड्डा यांची पोस्ट

दरम्यान, उपनेते पदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढा यांनी ‘X’ (ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘इव्हिल आय’ (Evil Eye) इमोजी वापरला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी संसदेत सर्वसामान्यांच्या हितासाठी उठवलेल्या आवाजाची झलक दाखवली आहे. मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा, मोबाइल रिचार्जमधील 28 दिवसांचा ‘स्कॅम’,इन्कमिंग कॉल चार्जेस आणि डेटा एक्स्पायरी समस्या, पेपर लीक प्रकरण आणि हवाई प्रदूषणाचा प्रश्न, आरोग्य विम्यावरील GST आणि विमानतळावरील महागडे खाद्यपदार्थ, पॅटर्निटी लीव (पितृत्व रजा) आणि बँकांमधील मिनिमम बॅलन्स दंड, अशा प्रमुख मुद्द्यांचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवे उपनेते अशोककुमार मित्तल यांची प्रतिक्रिया

अशोककुमार मित्तल यांनी उपनेतेपदी निवड झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “हा बदल एक सामान्य प्रक्रियेचा भाग असून यामागे कोणतेही विशेष कारण नाही. आज माझी निवड झाली आहे, उद्या दुसऱ्या कोणाची होईल.” तसेच, राघव चड्ढा हे पक्षाचे ज्येष्ठ खासदार असून त्यांच्याकडून जे काही शिकलो, ते पुढे नेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. “जी माहिती द्यायची होती, ती राज्यसभा सचिवालयाला कळवण्यात आली आहे,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर संक्षिप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Check Also

15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश

राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. जिल्हा परिषदा निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ …