28/02/26
Breaking News

ज्ञानेश्वरी जीवन उध्दाराची संजीवनी – विजयकुमार फड

सेलू : सुंदर संस्कृती आणि माणूस घडवण्याचे काम आपल्या अध्यात्माने केले आहे . ज्ञानेश्वरीने देह हेच मंदिर याचे भान दिले असल्याने ज्ञानेश्वरी ग्रंथ जिवन उध्दराची संजिवनी असल्याचे प्रतिपादन निवृत्त जिल्हाधिकारी विजयकुमार फड यांनी केले आहे. शहरातील नूतन विद्यालय सभागृहात आयोजित स्व. जनुभाऊ रानडे व्याख्यान मालेचे पहिले पुष्प गुंफताना सोमवार २३ फेब्रुवारी रोजी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आनंद गुजर, हरिभाऊ चौधरी, उपेंद्र बेलुरकर उपस्थित होते. ते म्हणाले की, ज्ञानेश्वरी वाचुन स्वतःला जाणने हिच खरी भक्ती आहे. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द जीवन उध्दाराची संजीवनी आहेत. ज्ञानेश्वरीच्या वाचनाने आपल्या सर्व अडचणी दूर होतात. आपल्या हातून चुकीचे काही घडत नाही. त्यामुळे आपण ज्ञानेश्वरी अंतःकरणापासुन वाचायला हवी. समाजाला दिशा देण्याचे महान कार्य माउलींनी केले आहे.
संत निवृत्तीनाथ,संत ज्ञानेश्वर,संत सोपानदेव,संत मुक्ताबाई आदी भावंडांचा समाजाने आदर्श घेतला तर कौटुंबिक व सामाजिक कलह निर्माण होणार नाहीत. एवढेच नव्हे तर,देशभरातील पन्नास टक्के केसेस कमी होतील.केवळ सकारात्मक मानसिकतेतून मानवाची प्रगती होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदाने जगले पाहिजे हेच ज्ञानेश्वरी शिकवत असल्याने,माऊली सुखाचे आगर असल्याचे विजयकुमार फड यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले .
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल, आयोजित आणि देवगिरी नागरी सहकारी बँक लि. छत्रपती संभाजीनगर प्रायोजित स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे १४ व्या वर्षाचे पहिले पुष्प ‘ समग्र ज्ञानेश्वरी माऊली ‘ या विषयावर गुंफले. संतोष नेवपुरकर यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक नामदेव एकशिंगे यांनी दिला. उपेंद्र बेल्लूरकर यांनी प्रास्ताविक केले. विजय चौधरी यांनी सुत्रसंचालन केले. तर विकास पिंगळे यांनी आभार मानले. सामूहिक पसायदानाने सांगता झाली .कार्यक्रम यशस्वीतेसाठी विवेकानंद शैक्षणिक संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व देवगिरी बॅंकेचे अधिकारी कर्मचारी यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमासाठी श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

Check Also

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान, नूतन विद्यालयाचा उपक्रम

सेलू: नूतन विद्यालयात मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती निमित्त सोमवार ( दि.२३) …