गंगाखेड – शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून, अनेक भागांत नागरिक डेंग्यूने बाधित होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे वाढली असताना देखील, गंगाखेड नगरपालिकेकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
शहरातील विविध वसाहतींमध्ये आणि मुख्य भागात अजूनही फवारणी झालेली नाही. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभाग व पालिकेच्या निष्क्रियतेमुळे संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधक पावले उचलली जात नसल्याची टीका होत आहे.
“शहरात रोज नवे डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत परभणी , नांदेड अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी जात आहे. तरीही पालिकेची कोणतीच फवारणी नाही. आमच्या आरोग्याशी कुणी खेळ मांडला आहे का?” असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
यापुढे परिस्थिती बिघडण्याआधी, गंगाखेड नगरपालिकेने तातडीने फॉगिंग आणि औषध फवारणी सुरू करावी, अशी जोरदार मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे.