1 ऑगस्ट 2025 किंवा त्यानंतर उघडण्यात आलेल्या बचत खात्यांसाठी ICICI बँकेने सरासरी किमान शिल्लक (Average Minimum Balance) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. NDTV Profit ला नाव न सांगण्याच्या अटीवर एका बँक अधिकाऱ्याने सांगितले की, हा निर्णय प्रीमियम ग्राहकांचा वर्ग वाढवण्यासाठी घेतला आहे.
मेट्रो आणि शहरी शाखांमध्ये मासिक सरासरी किमान शिल्लक (Minimum Average Monthly Balance – MAMB) आता 50 हजार असेल ही रक्कम याआधी 10 हजार होती. अर्ध-शहरी शाखांमध्ये ती 5 हजारावरून 25 हजार इतकी वाढवण्यात आली आहे. तर ग्रामीण शाखांमध्ये 5 हजारावरून दुप्पट म्हणजे 10 हजार इतकी झाली आहे. ही वाढलेली MAMB फक्त 1 ऑगस्ट 2025 नंतर उघडलेल्या नव्या खात्यांवर लागू होईल.
ग्राहकांनी किमान शिल्लक राखण्यात अपयश आल्यास कमतरतेच्या 6% इतका दंड किंवा 500 यापैकी जो कमी असेल तो आकारला जाईल. हा निर्णय भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एकासाठी मोठा बदल मानला जात आहे. विशेषतः जेव्हा इतर बँका दंड कमी किंवा पूर्णपणे माफ करत आहेत. उदाहरणार्थ- स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्व किमान शिल्लक आकार पूर्णपणे रद्द केले आहेत.
बँकेने रोख व्यवहारांसाठी सेवा शुल्कामध्येही बदल केला आहे. शाखांमध्ये आणि कॅश रिसायकलर मशीनद्वारे रोख जमा करण्यासाठी दर महिन्याला तीन मोफत व्यवहार करता येतील.
प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 150 आकारले जातील. एका महिन्यात 1 लाखांच्या एकत्रित जमा रकमेपर्यंत कोणतेही शुल्क नाही. मात्र त्यापेक्षा जास्त रकमेवर 1 हजारा मागे 3.5 किंवा 150 यापैकी जी जास्त असेल ती रक्कम आकारली जाईल. तृतीय पक्षाच्या (Third-party) रोख जमा व्यवहारांना प्रति व्यवहार 25 हजाराची मर्यादा असेल.
शाखांमधून रोख पैसे काढण्यासाठीही हाच नियम लागू राहील. दर महिन्याला तीन मोफत व्यवहार, अतिरिक्त प्रत्येक व्यवहारासाठी 150, आणि 1 लाखांपर्यंत मोफत एकत्रित मासिक मर्यादा. या मर्यादेपेक्षा जास्त रकमेवर 1 हजारा मागे 3.5 किंवा 150, यापैकी जो जास्त असेल तो आकारला जाईल. तृतीय पक्षाच्या पैसे काढण्याच्या व्यवहारांसाठीही प्रति व्यवहार 25 हजाराची मर्यादा असेल.
Shabdraj www.shabdraj.com