परभणी,दि 27 ः
जिल्ह्यातील प्रसारमाध्यम क्षेत्रात सातत्याने दर्जेदार आणि सामाजिक भान असलेले पत्रकारितेचे योगदान देणारे एबीपी माझा वृत्तवाहिनीचे परभणी जिल्हा प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दुरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीची ही राज्यस्तरीय पातळीवरील दखल ठरली आहे. ५१ हजार रुपये रोख आणि राज्य शासनाचे प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पंकज क्षीरसागर हे गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ परभणीतील पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी सहारा समय मुंबई, मी मराठी, आयबीएन लोकमत आणि सध्या एबीपी माझा या प्रतिष्ठित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये आपली पत्रकारितेची छाप सोडली आहे. त्यांच्या वार्तांकनाचा केंद्रबिंदू नेहमीच समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देणे आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवाज उठवणे हाच राहिला आहे. विशेषतः जिल्ह्यातील विकासकामे, सामाजिक प्रश्न, आणि प्रशासनाची अंमलबजावणी यावर त्यांनी सडेतोड वार्तांकन केले आहे.त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल दैनिक शब्दराज मिडीया परिवाराकडून त्यांचे अभिनंदन.