28/02/26
Breaking News

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार,भाजपाकडून विनोद तावडे ?

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपला ‘पत्ता’ खोलला आहे. सोमवारी रात्री पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पक्षाची सर्व धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची खलबते पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर होते. मात्र, आता त्यांना थेट दिल्लीच्या वरिष्ठ सभागृहात (राज्यसभा) पाठवून पक्षाने तरुण नेतृत्वाला संधी देण्याचे निश्चित केले आहे. येत्या २६ फेब्रुवारीला वरळी डोम येथे होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची अधिकृतपणे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली जाईल.

भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक; तावडेंना संधी?

दुसरीकडे, भाजपनेही आपले उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. आज रात्री १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. महायुतीकडून पुन्हा एकदा आरपीआय नेते रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित आहे.

भाजपच्या वाट्याला येणाऱ्या उर्वरित तीन जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. तावडे यांना राज्यसभेवर पाठवून पक्ष त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रीय स्तरावर उपयोग करण्याची शक्यता आहे.

अशी होते राज्यसभा निवडणूक

राज्यसभा खासदारांसाठी निवडणुकीची प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा खूप वेगळी आहे. राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात, म्हणजे जनता नाही तर आमदार त्यांना निवडतात.

निवडणुका दर दोन वर्षांनी होतात, कारण राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे आणि त्याचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात.

राज्यसभा जागांची एकूण संख्या 245 आहे. यापैकी 233 जागांवर अप्रत्यक्षपणे निवडणुका होतात आणि 12 सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात.

राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी किती मतांची आवश्यकता असते, हे आधीच ठरलेले असते. मतांच्या संख्येची गणना एकूण आमदारांची संख्या आणि राज्यसभा जागांच्या संख्येच्या आधारावर होते. यात एका आमदाराच्या मताचे मूल्य 100 असते.

विजयाचे गणित: ३७ मतांची ‘लक्ष्मणरेषा’

राज्यसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला जिंकण्यासाठी एका निश्चित संख्येने मतांची आवश्यकता असते, ज्याला विजयाचा कोटा (Quota) म्हणतात. महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. रिक्त होणाऱ्या जागा 7 आहेत.

राज्यसभा निवडणुकीसाठी सूत्र

एकूण आमदारांची संख्याx१००/(राज्यसभेच्या जागा+१)= +१ २८८X१००/(७+१)= +१ २८८00/८= +१ ३६००= +१ ३६०१ कारण एका आमदाराच्या मताचे मूल्य 100 असते. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या एका राज्यसभेच्या जागेवर विजयासाठी किमान 36 आमदारांची गरज असेल.

राज्यसभेसाठी मविआमध्ये चुरस

संख्यीय बलाल पाहता महायुती आपल्या हक्काच्या मतांच्या आणि अतिरिक्त मतांच्या जोरावर ७ पैकी ६ जागा आरामात जिंकण्याची चिन्हे आहेत. तर, महाविकास आघाडीला त्यांच्या एकत्रित संख्याबळानुसार केवळ एका जागेवर समाधान मानावे लागेल. अशा स्थितीत मविआ आपला दुसरा उमेदवार उतरवून ‘घोडेबाजार’ करणार की निवडणूक बिनविरोध होणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

Check Also

विमान कंपनी मालकाच्या मुलाचं केंद्रीय मंत्र्याशी कनेक्शन-रोहित पवार

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही …