परभणी दि. 07 ः
परभणी तालुक्यातील 117 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया येत्या सोमवारी 14 जुलै रोजी पार पडणार असून, महिलांसाठी 59 पदे राखीव असल्याचे तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
ही आरक्षण सोडत प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवार (दि.14)रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व संबधित इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम 1964 अन्वये तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची अधिसूचना अन्वये परभणी तालुक्यातील सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्ग व महिलांसाठी सन 2026 ते 2030 या कालावधीसाठी जिल्हाधिकारी यांनी प्रवर्गनिहाय आरक्षण संख्या निश्चित केली आहे. परभणी तालुक्यातील एकूण 117 ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी 16 त्यापैकी 8 महिला राखीव, अनुसूचित जमातीसाठी 2 पैकी एक महिला राखीव, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 32 पैकी 16 महिला आणि खुल्या प्रवर्गातील 67 पैकी 34 महिलांसाठी अशा एकूण 117 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदापैकी 59 पदे ही महिलांसाठी राखीव असल्याचे तहसीलदार डॉ. राजापुरे यांनी कळविले आहे.
