परभणी,दि 08 (प्रतिनिधी)ः
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार पालम तालुक्यातील चाटोरी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी यांना मंगळवार (ता.८) रोजी राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, संस्थेचे ॲड.उज्वल निकम, ॲड.बी.के.बर्वे आदींची उपस्थिती होती.
सदरील पुरस्कार सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी संस्थेच्या वतीने दिला जातो. सचिन जोशी हे मागील वीस वर्षापासून अरुणोदय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. साहित्य संमेलने, ग्रंथालय शिबीरे, महाआरोग्य शिबीर, गोरगरजू विद्यार्थ्यांना साहित्यांचे वाटप,कॉल ऑन ब्लॅड, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण तसेच आरोग्य विषयक अभियान राबवून चाटोरी पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि नागरिकांना मदत करतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गास केलेली मदत लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, सिनेअभिनेते भाऊ कदम,क्रांती रेडकर,भदंत डॉ.राहुल बोधी, धम्मदीप भन्ते, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, बळीराम गायकवाड आदींना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.