परभणी,दि 01 ः
शहरातील जीवघेणा ठरत चाललेल्या गंगाखेड रोडवर झालेल्या दुर्दैवी बस अपघातात शेख समीर शेख मिया भाई व शेख मुशरान शेख मुस्तफा या दोन तरुणांनी आपला प्राण गमावला. २२ जून रोजी घडलेल्या या अपघाताने संपूर्ण परभणी जिल्हा हादरला, आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत, २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत तात्काळ उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली. या आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यांनी अखेर शिवसेनेच्या मागण्यांना प्रतिसाद देत आज १ जुलै रोजी तातडीची बैठक बोलावली.
बैठकीस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, महानगर संघटक शेख शब्बीर, शाखाप्रमुख प्रल्हाद आपशिंदे, प्रमुख बालाजी पांचाळ, शेख अनवर, अक्षय घंटी, अरबाज शेख आदींसह मोठा पदाधिकारी वर्ग उपस्थित होता. या बैठकीला प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्रवीण सुमंत, प्रादेशिक परिवहन अधिकारी जी. टी. पाटील, श्री. अंगमवार, श्री. बेले, श्री. कुकडे, तसेच महानगरपालिका प्रतिनिधी धैर्यशील जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीदरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गंगाखेड रोडवर अपघातग्रस्त ठिकाणांची यादी, नागरिकांच्या मागण्या व अपघाताचे कारणमीमांसा सादर केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने खालील उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित विभागांना दिले. यात रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसवणे, तात्काळ स्पीड ब्रेकर बसवणे, दुभाजकातून फक्त दुचाकी आणि हलक्या वाहनांनाच प्रवेश – यासाठी दिशादर्शक फलक बसवणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमण तात्काळ हटवणे, वसाहतीमधून येणाऱ्या रस्त्यांवर सतत चालू राहणारे पिवळे सिग्नल लावणे, उड्डाणपुलावरून ब्राह्मणगाव/परभणीकडे येणाऱ्या वाहनांना योग्य मार्गदर्शन करणारे फलक लावणे, गंगाखेड रोडचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत संयुक्त पाहणी असे आदेश दिले आहेत.
शिवसेना शिष्टमंडळासोबत गंगाखेड रोडची पाहणी
बैठकीनंतर तत्काळ जिल्हा प्रशासनाच्या प्रतिनिधींनी शिवसेनेचे माणिक पोंढे पाटील, शेख शब्बीर, प्रल्हाद आपशिंदे, शेख अनवर, अरबाज शेख, सचिन वाघमारे, गोपाळ कदम यांच्यासोबत गंगाखेड रोडची सविस्तर पाहणी केली. अपघात प्रवण ठिकाणांची नोंद घेण्यात आली, तसेच नागरिकांच्या प्रत्यक्ष तक्रारी ऐकून घेतल्या.
नागरिकांमध्ये समाधान, पण शिवसेना सज्ज
शहरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेचे स्वागत केले, परंतु शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला की उपाययोजना वेळेत व प्रभावीपणे लागू न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.“गंगाखेड रोड हा मृत्यूचा सापळा बनू दिला जाणार नाही,” असा ठाम इशारा उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे यांनी दिला. गंगाखेड रोडवरील अपघात रोखण्यासाठी अखेर प्रशासन जागे झाले असून, शिवसेनेच्या आंदोलनाने नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला आहे. आता या उपाययोजना प्रत्यक्षात राबवून त्याची अंमलबजावणी वेळेत होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, शिवसेनेने पुढील हालचालींसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.