31/03/26
Breaking News

अबब… ५६ गॅस सिलिंडरची चोरी

५६ सिलिंडरसह पावणे चार लाखांचा मुद्देमाल लंपास; खवणे पिंपरी येथील घटना

पाथरी / प्रतिनिधी – तालुक्यातील खवणे पिंपरी येथे चोरट्यांनी गॅस एजन्सीच्या गोदामावर डल्ला मारत तब्बल ५६ भरलेले गॅस सिलिंडर चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुमारे ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. २८ मार्च) रात्री ते रविवारी (दि. २९ मार्च) सकाळी ८ वाजेदरम्यान ही चोरी झाली. खवणे पिंपरी येथील ‘रुही इंडेन गॅस एजन्सी’च्या गोदामातून चोरट्यांनी ५६ गॅस सिलिंडर, ६ रेग्युलेटर आणि एमएच ४४ यू ०५७७ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन असा एकूण मुद्देमाल चोरून नेला.

 

या प्रकरणी गॅस एजन्सीचे व्यवस्थापक प्रमोद परळीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष मरळ, पोलीस हवालदार बाळासाहेब कदम आणि पोलीस शिपाई चंद्रकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

 

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे पेट्रोलियम पदार्थांसह घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत आहे. नोंदणी करूनही ग्राहकांना १० ते १२ दिवसांनी सिलिंडर मिळत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत ही चोरी झाल्याने गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेचा पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत.

Check Also

सेलूत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

सेलू ( प्रतिनिधी ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक स्वागताध्यक्ष तथा …