पिंपळनेर, ता. साक्री: येथे एका लग्नसमारंभाच्या आनंदावर विरजण पडले असून,साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरदेवाच्या बाजूकडील लोकांनी केलेल्या मारहाणीत नवरीकडील तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपळनेर येथे आज ( दि. १९) दुपारी पिंपळनेर शिवारात असलेल्या घोड्यामाळ (ता. साक्री) येथे विजू गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता.तत्पूर्वी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना दोन गटांत वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. नवरदेवाच्या बाजूने आलेल्या काही तरुणांनी नवरीकडील मंडळींवर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत: सुरेश सुपडुगिर गोसावी (रा. साक्री), साहील सुरेशगिर गोसावी (रा. साक्री), देवा रवींद्र पवार (रा. साक्री) अशी आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लग्नासारख्या पवित्र कार्यात ही घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रकोळ वादातून इतके टोकाचे पाऊल उचलले गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
Shabdraj www.shabdraj.com