सेलू / प्रतिनिधी – आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते सहज मिळालेले नाही.प्रत्येक हिंदुस्थानने या स्वातंत्र्याचा अर्थ समजून घ्यायला हवा.केवळ सत्तेचे हस्तांतरण म्हणजे स्वातंत्र्य नाही.इंग्रजांनी आपल्याकडे सत्तेचे हस्तांतरण केले पण तेव्हा स्वातंत्र्य मिळाले म्हणजे नेमके काय?हे आपण समजून घेतले पाहिजे. आजही इंग्रजांच्या काळातील नियम ,कायदे पाळले जातात.इंग्रजांना जेथे कर वसुली करायची तेथे एक प्रशासन व्यवस्था असावी म्हणून पोलीस प्रशासन केले गेले.पण इंग्रज गेले पण त्यांनी केलेले कायदे आजही आहेत.15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा दिल्ली मध्ये लाखो मृतदेह रस्त्यावर पडले होते.तरी पाकिस्तानला 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात ही शरमेची बाब आहे असे त्यांनी सांगितले.जोपर्यंत इतिहासाचा अभ्यास आपण करणार नाहीत तोपर्यंत आपले वर्तमान चांगले राहणार नाही असे प्रतिपादन दिल्ली येथील प्रसिद्ध पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.
येथील साई नाट्यगृहात आज दि 8 ऑगस्ट रोजी सायं.6 वा. वसंत प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ विधिज्ञ,श्री के.बा.शिक्षण संस्थेचे तत्कालीन सचिव कै वसंतराव खारकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध पत्रकार तथा निस्सीम राष्ट्रभक्त पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या ‘विश्वगुरु भारत’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, भारत माता आणि कै ऍड.वसंतराव खारकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी व्यासपीठावर श्री के बा शिक्षण संस्थेचे सचिव तथा वसंत प्रतिष्ठानचे महेशराव खारकर, ऍड.उमेशराव खारकर आदींची उपस्थिती होती.सुरुवातीला सच्चीदानंद डाखोरे,पूजा तोडकर यांनी ‘वंदे मातरम’ हे गीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेशराव खारकर यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रकाश कुरुंदकर यांनी दिला.
यावेळी पुढे बोलतांना कुलश्रेष्ठ यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील घटना व सध्याच्या भारतातील घटना,भारतीयांची मानसिकता,कर्म यासह भारत विश्वगुरू कसा आहे हे सांगितले.
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले की,साडेदहा लाख हिंदूंच्या हत्येनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली.तरीही आपल्याकडील काही राजकारणी पाकिस्तानला स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतात ही शरमेची बाब आहे.भारतात सत्ता हिंदूंच्या हातात असतांनाही काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी काश्मिरी पंडितांना हाकलून दिले,गोळ्या घालून ठार केले हे दुर्दैव नाही का?असा संतप्त सवाल कुलश्रेष्ठ यांनी उपस्थित केला.सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचाही परखड समाचार घेतला.भारताविरुद्ध बोलण्याची हिम्मत होतेच कशी? असा प्रश्न उपस्थित करत आपण जर खंबीरपणे एकत्र येत नाहीत तोवर असे होणार.यामुळे आपण सर्व सनातनी हिंदूंनी विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे.जोपर्यंत सनातनी हिंदू व्यवस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत आपले भविष्य उज्ज्वल आहे.देशाला कोणतेही सरकार चालवत नसते तर समाज चालवत असतो.आणि तो समाज सशक्त असायला हवा.भारत कधीच जातीवादी नव्हता.तर कर्मवादी होता.पण इंग्रजांनी सर्वात आधी जातीभेदाच विष भारतीयांच्या मनात भिनवले आणि स्वातंत्र्यानंतर राजकारण्यांनी याच जातीवादाला खतपाणी घालत आपली पोळी भाजून घेतली.पण समाजाचे मात्र यात वाटोळे झाल्याचेही त्यांनी सांगितले.मतदान,धर्म या शब्दांचे कसे चुकीचे अर्थ काढले जात आहेत हे त्यांनी सांगितले.यावेळी कुलश्रेष्ठ यांनी संपूर्ण भारत कसा विश्वगुरू आहे हे पटवून दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश बिनायके यांनी तर आभार ऍड.उमेश खारकर यांनी केले.
Shabdraj www.shabdraj.com