सेलू ( प्रतिनिधी )
उद्याचा दिवस उजाडेल हे सांगता येत नाही व उद्या आपला श्वास राहील याची देखील खात्री नाही .त्यासाठी मिळालेल्या देहाची इतिकर्तव्यता परमार्थ आहे .त्यासाठी इंद्रिय सबळ आहेत तोपर्यंतच केलेला खरा परमार्थ असतो .असे प्रतिपादन भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांनी श्रीमद भागवत कथेच्या निरुपणात केले .
येथील शाहू नगर मधील निलकंठेश्वर मंदिर मध्ये शाहू नगर मित्रमंडळाच्या वतीने या श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी त्यांनी सती चरित्राची कथा निरुपणात सांगितले की ,ज्ञान ज्याच्या भोवती भ्रमण करते त्याला चक्रवर्ती उपाधी मिळते व ती शंकर भगवान व ज्ञानेश्वर माऊलींना मिळाली आहे.मंगल व अमंगल दोन्ही वस्तू धारण करणारा शंकर भगवान आहे . वैराग्य प्राप्तीचे केंद्रस्थान म्हणजे स्मशान आहे .व तेच भगवान शंकराचे निवासस्थान आहे.कथा कीर्तनात देखील वैराग्य प्राप्त होते परंतु टिकत नाही .दुःख सहन करण्याला देखील एक सीमा असते व ती उल्लंघन झाल्यावर माणूस मृत्यूला कवटाळतो व तेच काम वडिलांच्या घरी अपमानीत झालेल्या माता सती ने केले .
यानंतर उत्तानपाद राजा व ध्रुव बाळाची कथा विस्तारित पणे विषद केली .नीतीने व सत्याने तसेच धर्माने वागणाऱ्याच्याच वाट्याला वनवास येतो .पूर्वी घरच संस्कारित होते परंतु हल्लीच्या काळी मुलांना संस्कार केंद्रात पाठवले जाते .ही शोकांतिका आहे .ध्रुव बाळाचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याला वयाच्या ५ व्या वर्षी संतदर्शन झाले .व तपाच्या बळावर देवाकडून अढळपदाची जागा प्राप्त करून घेतली .नरसिंह जन्माची कथा सांगताना महाराज म्हणाले की ,भक्त संकटात असतांना त्याच्या हाकेसरशी धावून येणारा विष्णूचा चौथा अवतार म्हणजे नरसिंह अवतार आहे .
भगवान विष्णू ने नरसिंह रूप घेऊन त्याला ब्रम्हदेवाने दिलेल्या सर्व वर साभाळीत हिरण्यकश्यपू चा वध केला .भक्त प्रल्हादाचे रक्षण केले .ही कथा विस्ताराने सांगितली .
यावेळी तबला साथ राम महाराज शिंदे तर संगीत साथ महादेव वानरे व दत्ता टोलमारे हे देत आहेत .
Shabdraj www.shabdraj.com