28/02/26
Breaking News

581 विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः एकसारखीच,26 शिक्षक निलंबित

वाशिम,दि 17 ः
शिक्षकांनीच १२वीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिममधील एका महाविद्यालयात हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २६ शिक्षकांना निलंबित करण्यात आलं असून विध्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव अमरावती बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकारानंतर शैक्षणिक वर्तुळात विविध चर्चाही रंगू लागल्या आहेत.

 

राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. सोमवारी फिजिक्सचा पेपर होता. त्यात भरारी पथकाने वाशिम जिल्ह्यातील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय (क्रमांक 0906), टो – जुमडाफाटा येथे धाड टाकली. त्यात परीक्षा सुरू असताना केंद्रावर सामूहिक कॉपी सुरू असल्याची बाब भरारी पथकाच्या निदर्शनास आली. यासंबंधीच्या माहितीनुसार, भरारी पथकाने 16 फेब्रुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास या परीक्षा केंद्राला भेट दिली. केंद्रावर केऊण 584 विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी 581 विद्यार्थी परीक्षेला प्रत्यक्ष हजर होते. पथकाने त्यांच्या उत्तरपत्रिकांची नमुना तपासणी केली, तव्हा अधिकारीही चक्रावून गेले.

परीक्षेला उपस्थित असणाऱ्या सर्व 581 विद्यार्थ्यांची उत्तरे शब्दशः एकसारखीच होती. जणूकाही सर्व विद्यार्थ्यांनी एकाच स्त्रोतातून उत्तरपत्रिका कॉपी केली होती. काही उत्तरपत्रिकांवर तर वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी पेन व पेन्सिलने विशिष्ट खुणाही केल्याच्या आढळल्या आहेत.

अशातच आता ज्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचीही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती, वाशिम जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिली आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांवरही कारवाई होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काल इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्राच्या पेपरवेली शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी परीक्षा केंद्रावर तपासणी केली होती. यावेळी काही विध्यार्थ्यांच्या उत्तरात त्यांना समानता आढळून आली होती. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी सर्वच वर्गखोल्यातील सीसीटीव्ही तपासले. त्यात हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.