राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही खळबळजनक आरोप केले. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे कशाप्रकारे घातपात असू शकतो, अशी थिअरी मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला. यावेळी रोहित पवार यांनी भाजपच्या ट्रोलर्सचाही समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी भावनेच्या भरात बोलतोय. पण मी भावनेच्या भरात बोलत असेन तर भाजप मला का ट्रोल करत आहे. समित ठक्कर हा एक बरेच चिल्ले-पिल्ले बाळगणारा ट्रोलर मला ट्रोल करत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी मीडिया मॅनेजमेंटचे काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीच्या नरेश अरोरा यांनाही लक्ष्य केले.
भाजप आणि इतर काही ट्रोलर्स, मी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत जे काही बोलत आहे, त्यावरुन मला वेड लागल्याचा प्रचार करणारे ट्रोल करत आहेत. होय मला अजितदादांवरील प्रेमापोटी वेड लागलंय. पण भाजप आणि इतर ट्रोलर्सना पैसे घेऊन काम करण्याचं वेड लागलंय. मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलं आहे. मला एकट्यालाच नाही तर महाराष्ट्रातील जनतेला हे वेड लागले आहे. त्यामुळे माझं ट्रोलिंग सुरु आहे. काही कॅशबॉक्स वाले लोकही मला ट्रोल करत आहेत, त्यांचं नाव वेगळं आहे. पण तुला किती पैसा वापरायचा आहे तो वापर. आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणूस आहे. या सगळ्या लोकांना मला एक सांगायचं आहे की, तुम्ही मला पाण्यात बघत आहात. पण माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते आणि मी रोहित पवार आहे. या महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी नागरिक माझ्यासोबत आहेत. हे लोक अजितदादांच्या अपघाताची चौकशी करण्याचे काम करत आहेत. माझ्यासोबत समित ठक्कर याच्यासारखे पैशांसाठी काम करणारे चिरकूट ट्रोलर्स नाहीत. तर स्वाभिमानी लोक आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले.
VSR विमान कंपनीच्या मालकाचा मुलाचं मोदींच्या मंत्र्याशी कनेक्शन, सूनही घोटाळेबाज, मायामी बेटावर वास्तव्य: रोहित पवार
आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले. अजितदादांच्या विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूर खूप दारु प्यायचा. तो तीन ते चार वर्षांसाठी निलंबित झाला होता. व्हीएसआरमध्ये तो कमी पगारावर काम करत होता. रोहित सिंह हा व्हीएसआरचा मालक विजय सिंग याचा मुलगा आहे. तो सध्या अमेरिकेतील मायामी येथे जाऊन राहत आहे. श्वेता सिंग ही रोहित सिंग याची पत्नी आहे. तीदेखील एका जेट कंपनीत होती. तिकडे रॅकेट चालवण्याच्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यायची वेळ आली. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचा तात्काळ राजीनामा घ्यायला हवा. ते व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग याच्या लग्नाला होते. त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. सध्या ज्या चुका समोर आल्या आहेत त्यावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. मुळात हवाई उड्डाण मंत्री यांचाच व्हीएसआर कंपनीच्या मालकाशी संबंध आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत जाऊन बसलाय. त्याला परदेशात जाण्याची परवानगी कशी काय मिळाली?, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
लेगेसी आणि लिएर जेट ही वेगवेगळ्या प्रकारची विमाने आहेत, ती चालवण्यासाठी वेगळा परवाना लागतो. तुम्ही यापैकी एक विमान चालवत असाल तर दुसरे विमान चालवू शकत नाही. मात्र, सुमित कपूर आणि रोहित सिंग हे दोघेही ही विमाने चालवत होते, याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. त्यामुळे आता व्हीएसआरकडून बनावट कागदपत्रं बनवण्याचे काम सुरु आहे. व्हीएसआरचा एक वैमानिक कॅप्टन कार्लोस हा व्हेनेझुएलाचा होता. तो भारतात येताना पॅसेंजर म्हणून यायचा. पण विमानात शिरल्यानंतर तो कॉकपीटमध्ये जाऊन विमान चालवायचा. व्हीएसआर कंपनीकडून अशा अनेक चुका लपवल्या गेल्या आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
Shabdraj www.shabdraj.com