01/11/26
Breaking News

औंढा नागनाथ येथे ‘सुरक्षित बचपन’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

औंढा नागनाथ,दि 31 (प्रतिनिधी)ः

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या निर्देशानुसार व निर्धारित कार्यक्रमानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर  रोजी  औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), औंढा नागनाथ येथे ‘सुरक्षित बचपन’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तालुका विधी सेवा समिती, औंढा नागनाथ यांच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) श्रीमती सी. एस. मेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वकील संघ औंढा नागनाथ, जागृती युनिट व शिक्षा युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. एस. कदम यांनी केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) श्रीमती सी. एस. मेहरे उपस्थित होत्या. तसेच पोलीस निरीक्षक श्री. डोंगरे, ॲड. एस. जी. मुळे व ॲड. एम. पी. सत्त्वधर यांनी विद्यार्थ्यांना विविध कायदे व सुरक्षिततेच्या उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO Act) अंतर्गत बालकांचे संरक्षण, बालकांच्या हक्कांविषयी जागरूकता, वाहतूक नियमांचे पालन, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाइन क्रमांकांची माहिती देण्यात आली.

यामध्ये पोलीस हेल्पलाइन क्रमांक ११२, चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ आणि सायबर गुन्ह्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक १९३० यांचा वापर कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. बालकांनी कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला बळी पडू नये, अन्याय झाल्यास न घाबरता संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहनही मार्गदर्शकांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या प्रभारी शिक्षकांनी केले. यावेळी पोलीस जमादार गजानन गडदे, डी. डी. सुपनर (कनिष्ठ लिपिक), संस्थेतील शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

विभागीय तायक्वांदो स्पर्धेत ग्लोबलच्या अक्षरा महाजनला रौप्यपदक

हिंगोली,दि 31  शिव शाहू प्रतिष्ठाण, पिंपळखुटा द्वारा संचलित व मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा पुरस्कारप्राप्त …