01/11/26
Breaking News

दुष्काळ हा ना अस्मानी, ना सुलतानी, तो मानव निर्मित. – प्रसाद चिक्षे

मानवत (प्रतिनिधी) : भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असताना पाण्याचा अमर्याद उपसा आणि निसर्गाचा ऱ्हास सुरूच आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जलसंधारणाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अन्यथा भविष्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल, असे प्रतिपादन ज्ञानप्रबोधिनी, अंबाजोगाईचे प्रमुख प्रसाद चिक्षे यांनी केले.

शिक्षक पालक संघाच्या वतीने आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेत २८ ऑक्टोबर रोजी त्यांनी ‘महाराष्ट्रातील जलसंकट आणि मानवनिर्मित दुष्काळ’ या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रा. गजानन आंबेकर होते.

दुष्काळ हा केवळ निसर्गाच्या अनियमिततेचा परिणाम नसून मानवी हस्तक्षेपामुळे त्याची तीव्रता वाढत आहे. नदीपात्रातील वाळूचा बेसुमार उपसा झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असल्याने पाणी साठवून ठेवण्याची जमिनीची क्षमता घटत आहे. या दोन्ही बाबींचा थेट परिणाम भूजल पातळी आणि शेतीवर होत असल्याचे चिक्षे यांनी स्पष्ट केले.

पाण्याच्या उपलब्धतेबाबत समाजात पुरेशी जाणीव नसल्याने पाण्याचा वापर अत्यंत बेफिकिरीने केला जात आहे. घराघरांत बोअरवेल खोदण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात; मात्र भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण करण्याकडे दुर्लक्ष होते. ही विसंगती दूर करण्यासाठी प्रत्येक बोअरवेलचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी किती पडते, किती काळ पडते आणि त्याचे प्रमाण किती आहे, याची माहिती प्रत्येक गावाने व नागरिकाने ठेवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

अंबाजोगाई तालुक्यातील राडी तांड्याचा दाखला देत त्यांनी जलव्यवस्थापनातील त्रुटींचे गांभीर्य विशद केले. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केवळ शासनाच्या उपाययोजना पुरेशा ठरणार नाहीत. त्यासाठी गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी राहणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पाणी ही अमर्याद उपलब्ध असणारी संपत्ती नसून प्रत्येक थेंबाचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाण्याचा वापर जरूर करा; मात्र त्याची नासाडी टाळा. आज केलेले जलसंवर्धनाचे प्रयत्नच उद्याच्या पिढीचे पाणी सुरक्षित ठेवू शकतात, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोनय्या कीर्तनकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लता भरड, प्रा. रुपेश देशपांडे, शशिकांत नेवरेकर, श्रीकांत माकुडे, अक्षय कत्रुवार आणि अमित कहेकर यांनी परिश्रम घेतले.

Check Also

विभागीय तायक्वांदो स्पर्धेत ग्लोबलच्या अक्षरा महाजनला रौप्यपदक

हिंगोली,दि 31  शिव शाहू प्रतिष्ठाण, पिंपळखुटा द्वारा संचलित व मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा पुरस्कारप्राप्त …