05/02/26
Breaking News

संघर्षातूनच माणूस घडतो, विद्यार्थ्यांनी संघर्षासाठी तयार रहावे – न्यायमूर्ती संजय देशमुख.

परभणी,दि 04 ः
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी आणि परभणी जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायमूर्ती मा. श्री. संजयजी देशमुख यांचे भारतीय साक्ष्य अधिनियम यावर आधारित व्याख्यान आयोजीत केले होते. या प्रसंगी त्यांनी प्रथम महाविद्यालयाच्या प्रशस्त ग्रंथालयाची पाहणी करून ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथसंग्रह, ग्रंथालय संगणकिकरण आणि ग्रंथालयाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा व सुविधा या बद्दल प्रशंसा केली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी मंचावर मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथील मा. न्यायमूर्ती श्री. संजयजी देशमुख, परभणी जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर तसेच परभणी जिल्हा विधी संघाचे अध्यक्ष ॲड. मंचकरावजी सोळंके, उपाध्यक्ष ॲड. प्रताप झिनझान व सचिव ॲड. झबी उर रहमान आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धर्मापुरीकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. एम.एल. धर्मापुरीकर यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर तसेच श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल आढावा घेतला व मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत नावाजलेल्या या संस्थांच्या कार्याच्या गौरवपूर्ण उल्लेख केला .तसेच विधी महाविद्यालयातर्फे भविष्यातही अशा वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची मालिका सुरूच राहील असे आश्वासनही दिले. मा. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना न्या.श्री.संजयजी देशमुख यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय साक्ष्य अधिनियमाच्या विविध कलमांची अत्यंत सुलभ भाषेत उकल करून दाखवली. तथ्यांची संबद्धता, असंबद्धता आणि त्यामुळे न्यायालयामध्ये ठरणारी तथ्यांची ग्राह्यता या बरोबर संबद्धता ठरवत असताना तज्ञांची मते आरोपीचे चारित्र्य यांचे महत्त्व किती असावे, सत्य व न्याय यात श्रेष्ठत्व हे न्याय यासच समजावे असे सांगितले. या व्याख्याना दरम्यान मा. न्या.श्री देशमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी शारीरिक आरोग्य हे कसे महत्त्वाचे आहे हे उदाहरणासहित समजावून सांगितले. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणासाठी समर्थ असावी व त्यासाठी त्यांनी स्वतःची शारीरिक क्षमता वाढवावी व आपले मनोधैर्य मजबूत करावे आणि त्यासाठी शारीरिक व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा यामध्ये सातत्य राखावे असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. मुली व महिला यांनी आत्मरक्षणासाठी सतत सज्ज राहावे असे त्यांनी या दरम्यान सुचवले आणि याप्रसंगी स्वसंरक्षणासाठी साहित्य सतत सोबत ठेवणाऱ्या मुलींचा यथोचित सत्कारही केला. याप्रसंगी मा.न्या.श्री. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित सर्वांना व्याख्यानादरम्यान प्रश्न विचारून अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक साहित्य देऊन प्रोत्साहित केले परिणामी व्याख्यान हे एकतर्फी न होता सर्व समावेशक होऊन विद्यार्थ्यांना भारतीय साक्ष्य अधिनियम या जटील कायद्याची माहिती सोप्या भाषेत मिळाली. सोबतच त्यांनी पुराव्यांची ग्राह्यता या विषयावर देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी या विषयावर उपस्थितांच्या शंकांचे निरसन देखील केले. या व्याख्यानास परभणी जिल्हा न्यायालयातील अनेक ज्येष्ठ वकील तसेच परभणी जिल्हा न्यायालयातील कार्यरत २० हून अधिक न्यायाधीश यांची उपस्थिती लाभली. याशिवाय महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य मा. श्री. चंद्रशेखरजी नखाते मा. श्री. संतोषजी बोबडे व मा. श्री. संतोषजी इंगळे हे देखील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. प्रकाशजी सोळंके, सचिव मा. श्री सतीशजी चव्हाण तसेच केंद्रीय कार्यकारिणी व महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्य यांनी शुभेच्छा व्यक्त करून कार्यक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.हर्षा सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन ॲड. प्रताप झिंझान यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …