मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लोकसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या नव्या परिपत्रकात (Party Position in Lok Sabha) श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी नोंद करण्यात आली असून, त्यांच्या गटात एकूण 13 खासदारांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटातून आलेल्या सहा खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला अधिकृत मान्यता मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसमधील फुटीर खासदारांच्या प्रकरणावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला, तरी ठाकरे गटातील सहा खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना सध्या स्वतंत्र गट म्हणून बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ठाकरेंवर शिंदेंची टीका
या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले,
“ठाकरे गटाकडून शिवसेनेत येणाऱ्या आमदार-खासदारांवर पैसे घेऊन पक्षांतर केल्याचे आरोप केले जातात. मात्र, जेव्हा हेच लोक त्यांच्या पक्षात असतात तेव्हा ते चांगले वाटतात आणि पक्ष सोडल्यानंतर त्यांनाच वाईट ठरवले जाते. हजारो कार्यकर्ते, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी त्यांना का सोडून जात आहेत, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे.”
शिंदे पुढे म्हणाले, “पक्षप्रमुखाचे काम आपल्या आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे असते. त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे नाही. तसे झाले तर लोक पक्षात कसे टिकतील? त्यामुळे लोक पक्ष का सोडत आहेत, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.”
Shabdraj www.shabdraj.com