14-day ban on assembly imposed in Pune! Gathering of more than 5 people prohibited from July 21 to August 3 | What is the reason?
पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २१ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश २१ जुलै रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून लागू होणार असून ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे, धरणे, आंदोलने, बंद, उपोषणे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गर्दी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षा कायम राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे आंदोलन सुरू असून, त्याला पाठिंबा देण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून देशभरात आंदोलने केली जात आहेत. रविवारी मुंबईतही त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, सोमवारी संसदेवर मोर्चा तसेच राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Shabdraj www.shabdraj.com