17/10/26
Breaking News

पूर्णा तालुक्यात 5.5 कोटींची शेतकरी फसवणूक; 6,800 क्विंटल शेतमाल घेऊन भुसार व्यापारी फरार

₹5.5 Crore Farmer Scam!
Trader Absconds with 6,800 Quintals of Produce

पूर्णा प्रतिनिधी / सुशील दळवी – पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून तब्बल 100 ते 150 शेतकऱ्यांची सुमारे 5.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हळद, सोयाबीन, हरभरा, गहू आणि तूर असा एकूण सुमारे 6,800 क्विंटल शेतमाल खरेदी करून त्याचे पैसे न देता व्यापारी आपल्या मुलासह फरार झाल्याचा आरोप आहे.

 

 

या प्रकरणी शेख हमीद शेख बालेसाब आणि शेख सरू शेख बालेसाब (पिता-पुत्र) यांच्याविरोधात शुक्रवारी (17 जुलै) रात्री उशिरापर्यंत पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

 

एरंडेश्वर हे शेतीप्रधान गाव असून, संबंधित व्यापारी गेल्या काही वर्षांपासून येथे वास्तव्यास होते. सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्यांकडून भुसार माल खरेदी करून वेळेवर पैसे दिल्याने त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला. त्यानंतर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल त्यांच्याकडे विकला.

 

 

मात्र, गेल्या काही महिन्यांत व्यापाऱ्यांनी 1,096 क्विंटल हळद, 3,630 क्विंटल सोयाबीन, 2,000 क्विंटल हरभरा, 57 क्विंटल गहू आणि 35 क्विंटल तूर असा एकूण सुमारे 6,800 क्विंटल शेतमाल खरेदी केला. मालाची उचल केल्यानंतर “बाजारात तेजी-मंदी आहे, काही दिवसांत पैसे देतो,” असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना वारंवार आश्वासने दिली. मात्र, प्रत्यक्षात पैशांची देयके न देता त्यांनी टाळाटाळ केली.

 

 

यानंतर व्यापारी आपल्या मुलासह गावातून फरार झाल्याचे समोर येताच शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. संतप्त शेतकऱ्यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात धाव घेत प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड यांच्याकडे सामूहिक तक्रार दाखल केली.

 

 

प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात 100 ते 150 शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, लंपास करण्यात आलेल्या शेतमालाची बाजारभावानुसार किंमत सुमारे साडेपाच कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

 

 

या घटनेमुळे एरंडेश्वरसह संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपींना तातडीने अटक करून शेतकऱ्यांची थकीत रक्कम वसूल करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या फसवणुकीमुळे अनेक शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Check Also

पाणी वापराच्या काटकसरीबाबत गावागावात जनजागृती करा – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोली, दिनांक 17  : अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाली आहे. संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात शासनाने …