नागपूर – नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय वायुसेना (IAF) अधिकाऱ्याच्या पत्नीला जाळ्यात ओढून तिचे शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे याने प्लॉट खरेदी करून देण्याच्या बहाण्याने पीडित महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेऊन गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्याच्या आधारे महिलेला धमकावत वारंवार शोषण करण्यात आले तसेच लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणातील काही व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोपीने पीडितेला धमकावल्याचे तसेच तिच्यावर दबाव टाकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात अमीन शेख आणि एका मौलानाचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.
पीडित महिलेने आपल्या पतीला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर घटना उघडकीस आली. त्यानंतर सोनेगाव पोलिसांनी कारवाई करत अय्याज मदारे आणि अमीन शेख यांना अटक केली आहे. तर फरार असलेल्या मौलानाचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Shabdraj www.shabdraj.com