16/06/26
Breaking News

ऑपरेशन टायगरचा दुसरा अंक? ठाकरे गटातील खासदारांबाबत दिल्लीत मोठ्या घडामोडी

दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन स्वतंत्र गटाची भूमिका स्पष्ट करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि काही खासदार दिल्लीमध्ये दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. या हालचालींना मागील आठवड्यात वेग आला. ठाकरे गटाकडून खासदारांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मातोश्रीवर खासदारांची बैठकही घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही फुटीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला नाही.

 

ठाकरे गटाकडून खासदारांना सोबत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच शिंदे गटाने या खासदारांशी संपर्क वाढवल्याचे बोलले जात आहे. या गटाला केंद्रात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यताही राजकीय चर्चेत आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून संभाव्य फुटीर गटाला मान्यता देऊ नये, अशी भूमिका मांडल्याची माहिती आहे. मात्र, शिंदे गटाने यासाठी आधीपासूनच तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे.

 

दिल्लीत पोहोचलेले खासदार कोण?
ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, संजय जाधव आणि संजय दिना पाटील हे खासदार दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत हे ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलसाठी सक्रिय झाल्याचे समजते.

 

शिंदेंच्या वर्धापनदिन मेळाव्यात प्रवेशाची चर्चा
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापनदिन १९ जून रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर होणार आहे. याच मेळाव्यात ठाकरे गटातील सहा खासदार अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून, शिवसेनेतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे

कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील

Check Also

नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनल (LTT)–नांदेड विशेष गाडी धावणार

सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा नांदेड – सणासुदीच्या काळात वाढलेल्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यासाठी दक्षिण …