महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आमच्या भाषणा पेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंबू कापतंय, कोण रेडा कापतोय. माझ्या आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे. आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता तर कुठे असता तुम्ही? मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
तर सरकार कशाला पाडलं?
महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. देवेंद्र फडणवीस यांच वक्तव्य म्हणजे मला सका पाटलांची आठवण येते, त्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती. मुंबई आपल्या हक्कांची आहे, लढलो आणि आपण घेतली. काश्मीरमध्ये 370 कलम हटवायला आपण पाठिंबा दिला होता. ते म्हणाले होते, एक निशाण एक झेंडा. हिंदी सक्ती आम्ही लावून घेत नसतो. उद्धव ठाकरे यांनी निर्णय आणला म्हणतात. मी एवढं काम करत होतो तर सरकार कशाला पाडलं? महाराष्ट्रात मराठी सक्ती केल्यावर तो भेडिया बोलतोय. मराठी माणूस मुंबई बाहेर नेला, असं तुम्हाला वाटत असेल तर 2014 नंतर मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? तुम्ही आमच्यात गद्दारी करवली आणि आमचं सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे गुजरातला बसले आहेत. दोन व्यापारी त्यांच्यासाठी तुम्ही हे करत आहात, अशी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे, अशी केली. यानंतर त्यांनी आपले नेहमीचे माझ्या तमाम मराठी माता बंधू आणि भगिनींनो हे नेहमीचे वाक्य उच्चारले. राज ठाकरे यांनी म्हटले की, आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्व बाजूंनी कसा एकवटतो, हे चित्र त्यांना दिसले असते. पण फक्त मोर्चाच्या घोषणेनेच यांनी माघार घेतली, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने कोणासाठी घेतला? कोणाला विचारायचं नाही, शिक्षणतज्ज्ञांना काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, बहुमत आहे, आम्ही निर्णय लादणार. पण तुमच्या हातात सत्ता असेल तरी विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर. हिंदी सक्तीच्या विरोधात मी सरकारला पत्रं लिहली. नंतर दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की, आम्ही काय म्हणतोय, ते समजून तर घ्या, ऐकून तर घ्या. मी त्यांना म्हटलं दादा तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन, पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्रं कुठून आणलं? ते केंद्र आणि राज्य सरकारमधील दुव्यासाठी आणलं. हायकोर्टात आणि इतर सगळीकडे दैनंदिन व्यवहार इंग्रजी भाषेत होतात, मग त्रिभाषा सूत्राची गरज काय? दक्षिणेत हे त्रिभाषा सूत्र नाही, मग यांनी महाराष्ट्रात प्रयोग करुन पाहिला. पण महाराष्ट्र पेटून उठतो त्यावेळी काय होतं, हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली. विनाकारण आणलेला विषय होता, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास आहेत आणि हिंदी न बोलणारी राज्य आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्याचा विकास करता आला नाही. हिंदी भाषक राज्यातून लोकं इकडे नोकरीसाठी येत आहेत आणि हे बोलतात हिंदी शिका, मग हिंदी कोणासाठी शिकायचं?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. अमित शाह म्हणतात, भविष्यात ज्याला इंग्रजी येईल, त्याला लाज वाटेल. पण त्यांनाच स्वत:ला इंग्रजी येत नाही येत. मराठा साम्राज्य अटकेपार पोहोचले होते. मराठ्यांनी सव्वाशे वर्षे आम्ही राज्य केलं, पण आम्ही मराठी लादली का?, असा सवाल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात विचारला.