सेलू.. प्रतिनिधी
प्रत्येक माणसाच्या जीवनात जीवन जगत असताना कौटुंबिक व भौतिक गोष्टींमुळे आनंद मिळतो . मात्र संसारिक जीवनाचे सार दुःखदायकच आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला आत्मिक आनंद व समाधान मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक भास्करराव कुलकर्णी मसलेकर यांनी केले आहे. ते येथील पेन्शनर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने आयोजित दसरा स्नेह मिलाप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवार २२ आक्टोबर रोजी बोलत होते. यावेळी पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शरद कुलकर्णी, गौतम सूर्यवंशी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीपादराव दिग्रसकर, रामचंद्र सुभेदार,ए.टी. देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, जीवनात प्रत्येक जण कष्ट करतो .आपले काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून आनंद शोधतो. मात्र कायमस्वरूपी टिकणारा आनंद मिळत नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर संसारिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतात .अशावेळी प्रत्येक निवृत्त व्यक्तीला आत्मिक समाधान व आनंदाची गरज असते .आणि ही गरज पूर्ण करण्याचे काम येथील पेन्शनर्स असोसिएशन हे अविरतपणे करत आहेत. एवढेच नव्हे तर ही संघटना प्रत्येक निवृत्ती व्यक्तीचे प्रश्न सोडवणे, सुखदुःखात सहभागी होणे, आणि वर्षातून एक दोन वेळा सहलीच्या माध्यमातून पर्यटनाचा आनंद देखील देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या संघटनेचे काम खूप मोलाचे आहे. आणि हे काम यापुढे देखील असेच अविरतपणे सुरू राहावे असा आशावाद भास्करराव कुलकर्णी मसलेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. यावेळी निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीपादराव दिग्रसकर यांनी आपण कोणत्याही ठिकाणी कार्य करत असताना, निवृत्त धारकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सेलू शहरातील निवृत्त धारकांचा प्रश्न कसा मार्गी लावला , हे देखील स्पष्ट केले. दरम्यान रवी मुळावेकर यांनी महा उपलब्धी ॲप संबंधित माहिती सर्व निवृत्तीधारकांना देऊन, हे अॅप आपल्या मोबाईल मध्ये सामाविष्ट करण्याचा आग्रह धरला .या संदर्भात सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय समारोपत करताना डॉ. शरद कुलकर्णी यांनी पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने सर्व निवृत्त धारकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कायम सुरू असतो . पेन्शन भवन हे आनंद भवन ठरावे यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करतो, असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए .टी देशमुख यांनी केले, तर गौतम सूर्यवंशी यांनी आभार मानले.
Shabdraj www.shabdraj.com