सेलू( प्रतिनिधी )
आशा आपराद लिखित ‘ भोगिले जे दुःख त्याला ‘ या आत्मचरित्रात लेखिकेने सहन केलेले दुःख, अन्याय, अत्याचार यांचे वास्तववादी चित्रण केले आहे. संघर्ष हेच जीवन आहे. पण, संघर्षातून मृत्यू येत नाही तर जीवन फुलते. आपले जीवन बदलायचे असेल तर शिक्षण हिच उज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. हेच ‘ भोगिले जे दुःख त्याला’ या आत्मचरित्रातून शिकायला भेटते. असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.स्मिता देऊळगावकर यांनी बुधवार ( दि. २५ ) रोजी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या एक दिवस एक पुस्तक उपक्रमाचे ३८ वे पुष्प गुंफताना केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम महसूल अधिकारी भाग्यश्री किर्तनकार या होत्या. डॉ. स्मिता देऊळगावकर प्रमुख व्याख्याता म्हणून बोलताना पुढे म्हणाल्या की, ” प्रा. आशा आपराद यांच्या वाट्याला बालपणापासूनच अपमान, उपेक्षाच आली. त्या घरच्यांना नकोशा होत्या. तरिही त्यांनी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिले. अपघात, आजारपण, गुलामीची वागणूक या चक्रव्यूहात त्यांचे विचारचक्र सुरू झाले. पुढे त्यांनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षणशास्त्राची पदवी घेताना त्यांना त्यांच्यातील सुप्त गुणांची जाणिव झाली. त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांचे जीवन बदलून गेले. हे सर्व शिक्षणामुळे शक्य झाले. आशा आपराद यांचा हा सर्व जीवन प्रवास आपल्यालाही कोणत्याही प्रतिकूलतेत हार न मानता जीवन जगण्याची प्रेरणा देतो. ” असेही डॉ. स्मिता देऊळगावकर म्हणाल्या.
कार्यक्रमात डॉ. सविता संजय रोडगे या जिल्हा परिषद सदस्य पदी निवडून आल्या बद्दल त्यांचा वसुधा महेश खारकर, कुंदा चंद्रशेखर मुळावेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. शरद ठाकर यांनी केले. सुत्रसंचलन मनिषा पांडे यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ. भाग्यश्री धामणगावकर यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी,डॉ.हर्षा माकोडे, डॉ.सविता साडेगावकर, करूणा बागले यांची उपस्थिती होती.
Shabdraj www.shabdraj.com