06/10/26
Breaking News

समृद्धी महामार्गावर नेमकी चोरी का होतेय?

महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ सध्या भयंकर दहशतीखाली आला आहे. अपघातांचं सत्र संपत नाही तोच आता समृद्धी महामार्ग कुख्यात दरोडेखोरांचा सुरक्षित अड्डा झाला आहे. एकाच रात्री सिन्नर आणि शिर्डी दरम्यान चक्क 4 गाड्यांवर हॉलिवूड सिनेमाला लाजवेल अशा पद्धतीनं दरोडा टाकून प्रवाशांना बेदम मारहाण करत लाखो रुपयांचं सोनं आणि रोकड लुटण्यात आली. 100 च्या सुसाट वेगानं धावणाऱ्या गाड्या रस्त्यावर खिळे आणि रॉड टाकून कशा रोखल्या जात आहेत? या महामार्गावर नेमकी चोरी का होतेय? यामागची धक्कादायक कारणं सविस्तर जाणून घेऊयात.

मागील आठवड्यात शुक्रवारी सिन्नर परिसरात घडलेल्या सर्व घटनांमध्ये दरोडेखोरांची पद्धत पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. चोरांनी पळण्यासाठी कोणतीही साधी गाडी न वापरता क्रेटा, महिंद्रा XUV700 आणि किया सेल्टॉससारख्या अत्याधुनिक, वेगवान एसयूव्हींचा वापर केला. आधी 100 पेक्षा जास्त वेगानं जाणाऱ्या कारसमोर लोखंडी रॉड किंवा खिळे फेकून टायर फोडले, गाडी थांबताच पुढे-मागे आपल्या एसयूव्ही आडव्या लावून 5 ते 6 दरोडेखोर धारदार शस्त्रं आणि बंदुकांच्या जोरावर काही मिनिटांत सर्व काही लुटून पसार होतात.
रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबईला निघालेले संभाजीनगरचे वकील श्रीकांत मिश्रा यांच्या कारचे 100 च्या स्पीडमध्ये खिळे टाकून टायर पंक्चर केले गेले. गाडी थांबताच पाठीमागून आलेल्या टोळीनं त्यांच्यावर हल्ला चढवून तब्बल 18 लाखांचा ऐवज लुटला. त्याच रात्री सिन्नरजवळ दुसऱ्या एका गाडीवर लोखंडी रॉड भिरकावून 37 हजार लुटले, तर नांदेडचे व्यावसायिक मोहम्मद फरहान यांच्या कुटुंबाची कारही मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास याच क्रूर पद्धतीनं अडवून लुटण्यात आली.
समृद्धी महामार्गावर चोरी होण्याची सर्वात मोठी संधी दरोडेखोरांना मिळते ती म्हणजे महामार्गावरील निर्मनुष्य वातावरण. या रस्त्यावर दूरदूरपर्यंत ना कोणती मानवी वस्ती आहे, ना कोणते ढाबे किंवा नियमित पेट्रोल पंप! महामार्गावर अनेक ठिकाणी विजेचे खांब बंद असून भीषण काळाकुट्ट अंधार असतो. एखादी घटना घडल्यास ओरडूनही कोणाची मदत मिळत नाही, कारण सुसाट वेगात असलेली इतर वाहने अंधारात थांबण्याचे धाडस करत नाहीत.
इतक्या मोठ्या एक्सप्रेसवेवर ज्या प्रमाणात हायवे पोलीस, क्विक रिस्पॉन्स टीम आणि नियमित गस्त (Patrolling) असायला हवी, तिचा प्रचंड अभाव दिसून येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळं अद्यापही अनेक मोकळ्या जागांवर नाही. यामुळे दरोडेखोरांना घटना घडवून महामार्गावरील लगतच्या एक्झिट पॉईंट्सवरून किंवा सर्व्हिस रोडवरून पळून जाणे अत्यंत सोपे जात आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बीड आणि धाराशिव भागातील कुख्यात सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या या महामार्गावर सक्रिय झाल्या आहेत. हे दरोडेखोर टोल नाक्यांवर किंवा अंधाऱ्या वळणांवर आधीच दबा धरून बसतात आणि महागड्या, कुटुंबासह प्रवास करणाऱ्या कार्सना टार्गेट करतात. अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने रस्त्यावर तीक्ष्ण खिळे आणि लोखंडी वस्तू टाकून वाहनाचा वेग रोखला जातो.
समृद्धी महामार्गावर रात्रीचा प्रवास करताना प्रवाशांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. जर मध्यरात्री गाडीला काही आदळल्याचा आवाज आला किंवा टायर पंक्चर झाले, तरी लगेच निर्जन अंधारात गाडी थांबवू नका. जोपर्यंत एखादा टोल नाका, उजेड असलेला भाग किंवा पोलीस चौकी दिसत नाही, तोपर्यंत गाडी धीम्या गतीनं पुढे नेत राहा. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित महामार्ग नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा आणि अनोळखी वाहनं पाठलाग करत असल्यास गाडीचा वेग कमी करू नका.

Check Also

निवडणुकीत ‘AI’चा धोका,आम्ही कोणासोबत जाणार नाही.-शरद पवार

‘आम्ही कोणासोबत जाणार नाही. यायचं असेल तर आमच्या या,’ असा खणखणीत संदेश देत शरद पवार …