परभणी,दि 23 ः
शेतकऱ्यांनी पैसे भरूनही शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळत नसल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यालयात सोमवार दिनांक 23 जून रोजी भजन आंदोलन केले. शेतकऱ्यांना तात्काळ सौर पंप वितरित करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी संघटनेने यावेळी केली.
शासनाच्या सौर कृषी पंप योजना अंतर्गत 25 टक्के रक्कम भरून अनेक शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी अर्ज केले परंतु शेतकऱ्यांना मागील आठ महिन्यांपासून कृषी पंप मिळाले नाहीत. 25 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्याने रक्कम भरली आहे केवळ 4761 शेतकऱ्यांना कृषी पंप वितरित करण्यात आले आहेत उर्वरित शेतकरी सातत्याने कृषी पंपासाठी महावितरण कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु महावितरण कडून कोणतेही समाधानकारक उत्तर दिले जात नाही, त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यालयात सोमवारी भजन आंदोलन केले. अखेर चार तासानंतर कोतवाली पोलिसांच्या मध्यस्थीने महावितरणचे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.या बैठकीत एका महिन्यात पंप दिले जातील असे आश्वासन देण्यात आले.आंदोलनात या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष केशव आरमळ, तालुकाध्यक्ष करण बोबडे, सेलू तालुकाध्यक्ष मंचक सोळंके, उपजिल्हाध्यक्ष अनंतराव चव्हाण, रामनाथ दादा चोपडे, गोपाळराव लोंढे, शिवाजी मानवते यासह वाघमारे आदी उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com