17/07/26
Breaking News

संतांच्या चरणीच खरे सुख आहे – ह.भ.प.श्रीहरि पितळे महाराज

सेलू/प्रतिनिधी
संतसंगतीमुळे आत्मिक सुख आणि ईश्वरभक्तीची गोडी लागते.संतांचे आचरण शुद्ध असते व ते समाजाला योग्य दिशा दाखवतात.संत म्हणजे नैतिक मूल्ये,अढळ ईश्वरभक्ती व माणुसकीची सेवा करणारे थोर पुरुष असतातअसे प्रतिपादन संत बाळाभाऊ महाराज पितळे नरसिंह संस्थानचे (मेहकर) ह.भ.प.श्रीहरि पितळे महाराज यांनी केले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी रथामागे दिंडी क्रमांक १५ चे मालक वै.ह.भ.प.गुरुवर्य बापूसाहेब महाराज वालुरकर यांच्या ३४ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कीर्तनात ते बोलत होते.शहरातील समता नगर भागात हा पुण्यतिथी उत्सव (दिनांक१७ मार्च) पार पडला.श्री संतांचिया माथा चरणांवरी ।
साष्टांग हे करी दंडवत ।
जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा हा अभंग सेवेसाठी निवडला.
पुढे बोलताना पितळे महाराज म्हणाले की,संतांच्या चरणावर माथा ठेवून त्यांना साष्टांग प्रणिपात करावा.त्यांच्या चरणांचा आश्रय घेतल्यामुळे विश्रांती अर्थात शांतता मिळते.त्यांच्या बोधामृत वाणीने मनात चैतन्य व निवांतपणा येतो.तुमच्याकडून कोणतीही सेवा घडताही पूर्वपुण्याचे फळ केवळ त्यांच्या सहवासामुळे प्राप्त होते. श्रुती संपन्नता व ब्रम्हनिष्ठता याबरोबरच कृपाळुपणा हा संतांचा महत्वाचा गुण असतो.संत नेहमी कृपेचा वर्षाव करतात. ज्यांचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही अशी जी चैतन्यस्वरूप व्यक्ती असते तिलाच संत म्हणतात.
निष्काम सेवेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वै.ह.भ.प.गुरुवर्य बापूसाहेब महाराज वालुरकर आहेत.वारकऱ्यांसाठी सकारात्मक ऊर्जेचा स्रोत तसेच शिष्यांच्या प्रगतीसाठी तळमळणारे संयमी थोर पुरुष होते.संत तोची जगी ।क्षमा दया ज्याच्या अंगी ।असे व्यक्तित्व त्यांचे होते. त्यांच्या कीर्तनात भक्तीची गोडी व ज्ञानाची खोली व समाज प्रबोधनाचा संदेश असायचा.संत बाळाभाऊ महाराज पितळे व वै. ह.भ.प.अण्णासाहेब महाराज वालुरकर यांच्या अध्यात्मिक कार्याचा व भेटीचा प्रसंग त्यांनी सांगितला.
पुण्यतिथी सोहळ्यासाठी फडातील वारकरी व भाविकांची उपस्थिती होती.

Check Also

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी …