24/06/26
Breaking News

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी अंतिम मुदतवाढ

हिंगोली, दि. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या तसेच निवास, भोजन व इतर सुविधांच्या अभावामुळे शिक्षण सुरू ठेवण्यास अडचण येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ मधील प्रलंबित (Sent Back) अर्जांच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाजकल्याण विभागाकडून अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधांसाठी आर्थिक सहाय्य थेट आधारसंलग्न बँक खात्यात जमा केले जाते.

विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर भरलेल्या अर्जांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून, त्रुटी आढळलेल्या व परत पाठविण्यात आलेल्या अर्जांची ऑनलाइन त्रुटी पूर्तता करण्यासाठी १६ जून २०२६ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

निर्धारित मुदतीत त्रुटी पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात अर्ज भरता येणार नाही तसेच ते योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन त्रुटी पूर्तता करून अर्ज सादर करावेत. तसेच ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, हिंगोली येथे जमा करावीत, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

**

Check Also

आमदार रोहित पवार शुक्रवारी हिंगोलीत

हिंगोली,दि 24 ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महासचिव शेतकऱ्यांचे तारणहार युवानेते आमदार रोहित …