04/02/26
Breaking News

कन्हेरवाडी शिवारात ४१ वर्षीय शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या

सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

सेलू (प्रतिनिधी) – तालुक्यातील वालूर येथील ४१ वर्षीय शेतकरी पांडुरंग आनंदराव शिंदे यांनी कन्हेरवाडी शिवारातील गट क्रमांक ७/१ मधील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना १४ नोव्हेंबर दुपारी ते १५ नोव्हेंबर सकाळी दरम्यान घडली. ही बाब १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. मयताच्या भावाने दिलेल्या माहितीवरून सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पांडुरंग शिंदे (वय ४१, रा. मोतीबंगला परिसर, वालूर) यांनी घटना स्थळी पोहोचून प्रथम आपली चप्पल आणि मोबाईल विहिरीजवळ ठेवले आणि त्यानंतर विहिरीत उडी मारली. सकाळी स्थानिक नागरिकांनी विहिरीत मृतदेह दिसताच पोलिसांना कळवले.

घटना कळताच वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार नितीन राठोड आणि मारोती जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून गजानन गात यांच्या रुग्णवाहिकेतून तो सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. तेथे वालूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल तोरकड यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

मयताचा भाऊ खंडू आनंदराव शिंदे यांनी दिलेल्या खबरेवरून कलम १७४ अन्वये (आकस्मिक मृत्यू) नोंद करण्यात आली आहे. पांडुरंग शिंदे यांच्या पार्थिवावर वालूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन राठोड करत आहेत.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …