परभणी ,दि 26
दक्षिण मध्य रेल्वेचा ऐतिहासिक क्षण आज मराठवाड्याने अनुभवला. हुजूर साहेब नांदेड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते (ऑनलाईन) हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
या प्रसंगी परभणी स्थानकावर गाडीचे आगमन होताच भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. स्थानक परिसरात ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी व उत्सवी वातावरण पाहायला मिळाले. उपस्थित कार्यकर्त्यांनी “वंदे भारत”चा जयघोष करीत आनंद व्यक्त केला.
यानंतर भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांनी परभणी स्थानकावरून गाडीला हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना केले. यावेळी स्टेशन मास्टर आणि गाडी चालक यांचा हार घालून सत्कार करण्यात आला, ज्यामुळे त्यांचा ऐतिहासिक कार्याचा गौरव केला गेला.
जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे म्हणाले, “वंदे भारत एक्सप्रेस ही केवळ रेल्वेगाडी नसून मराठवाड्याच्या विकासाचा वेग आहे. परभणीसह संपूर्ण मराठवाड्याला मुंबईशी जोडणारा हा द्रुतगती मार्ग प्रवास अधिक सोयीस्कर व आरामदायी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारता’च्या दिशेने घेतलेले हे पाऊल निश्चितच ऐतिहासिक ठरेल.”
परभणीसह संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांसाठी वंदे भारत एक्सप्रेस ही एक मोठी सुविधा ठरणार असून, या गाडीमुळे नांदेड–मुंबई प्रवास अधिक वेगवान व आरामदायी होणार आहे. यामुळे मराठवाड्याच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याची भावना नागीरीकांमध्ये व्यक्त होत आहे.
Shabdraj www.shabdraj.com