04/02/26
Breaking News

ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन्ही महिलांचे मृतदेह सापडले

हिंगोली,दि 13 (प्रतिनिधी)ः
वसमत तालुक्यातील गुंडा येथील ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन्ही महिलांचे मृतदेह शनिवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास  सापडले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी ता. 12 दुपारपासून धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पुर आला असून या पावसाचा सर्वात जास्त फटका वसमत तालु्क्याला बसला आहे. या शिवाय हिंगोली, कळमनुरी तालुक्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर वसमत तालुक्यात ग्रामीण भागात कागबन, रिधोरा, गुंडा या भागातील रस्ते बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान, गुंडा येथील गयाबाई अंबादास सारोळे (60) व सखुबाई विश्‍वानाथ भालेराव (55) ह्या इतर महिलांसोबत शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास मोठा पाऊस येत असल्यामुळे त्यांच्यासह इतर महिला शेतातून घराकडे निघाल्या होत्या. यावेळी गुंडा शिवारातील ओढ्याच्या पाण्यातून त्या घराकडे येत असतांना गयाबाई व सखुबाई ह्या दोघींना पाण्याचा अंदाज आलाच नाही. काही वेळातच त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने पथकाला घटनास्थळी रवाना केले. उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह महसूल विभागाचे पथक घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, गावातील सुमारे 50 पेक्षा अधिक तरुणांनी सायंकाळ पासून शोध मोहिम सुरु केली होती. रात्री उशीरा पाऊस व पुराचे पाणी कमी झाल्यानंतर शोध मोहिमेला गती आली. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सखुबाई भालेराव यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गयाबाई सारोळे यांचा मृतदेह गुंडा शिवारातील पाण्यात आढळून आला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Check Also

सेलू बसस्थानकात सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानची मागणी

सेलू ( प्रतिनिधी) सेलू हे तालुक्यातील महत्त्वाचे व मोठे बस स्थानक आहे .या बस स्थानकावरून …