नारायण पाटील
सेलू,दि (16)
मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे आजही अंगावर काटा आणणारा हा स्वातंत्र्य संग्राम होता.इंग्रजांपेक्षाही जुलमी राजवट निजामाची या मराठवाड्यात होती.अनेक जणांना या आंदोलनात हौतात्म्य आले.अनेकांनी आपल्या घराची होळी करून जुलमी निजमविरुद्ध सशस्त्र उठाव केला.परंतु या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये आज बहुतेकजण आता हयात नाहीत परंतु सेलू मध्ये या मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतलेले आणि आपल्या वयाची 100 वी गाठलेले बहुतेक परिसरात एकमेव या उठावाचे साक्षीदार असलेले भगीरथजी गेना यांनी मुक्ती संग्रामाच्या पूर्वसंध्येला उठावाच्या आठवणी जाग्या केल्या.
30 अकटोबर 1925 रोजी जन्म झालेले भगीरथजी गेना सध्या 100 वे वर्ष साजरे करत आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामात परभणी जिल्ह्यात स्टेट काँग्रेसचे ते पूर्णवेळ कार्यकर्ते राहिले आहेत तसेच नांदेड जिल्ह्यात उमरखेड येथे सुरू झालेल्या सशस्त्र कॅम्प मध्ये त्यांनी भूमिगत राहून तसेच कार्यालयीन कामकाज सांभाळत सशस्त्र लढ्यात सहभाग घेतला आहे.
परंतु अतिशय रोमांचकारी असलेल्या या उठावाची माहिती आजच्या विद्यार्थ्यांना व तरुण पिढीला देखील फारशी दिसत नाही.जे स्वातंत्रसैनिक या मुक्तीसंग्रामत होते त्यांच्या वारसांनाच फक्त हा इतिहास माहीत आहे.17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला एवढेच अनेकांना माहीत आहे.परंतु त्या स्वातंत्र्य संग्रामातील आठवणी आजच्या पिढीला सांगणे जरुरीचे आहे.कारण त्यांच्या इतिहासावरच पुढील पिढी घडू शकते.
हिंदुस्थान 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला.हिंदुस्थानमधीलच हैद्राबाद या संस्थानातील जनतेला मात्र हा हा स्वातंत्र्याचा उत्सव मराठवाड्यातील जनतेला साजरा करता आला नाही.कारण हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह याचे राज्य होते . त्या निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने ” रझाकार ” या संघटनेच्या माध्यमातून हिंदू जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. 15 ऑगस्ट 1947 ला जरी हिंदुस्थान स्वतंत्र झाला तरी जवळपास 11 महिने मराठवाड्यातील जनता पारतंत्र्यात होती.एकदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी मराठवाड्यातील जनता व नेते सज्ज झाले होते. निजामाच्या जुलमी राजवतीतून मुक्त होण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन,विनायकराव चारठाणकर, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे,अनंतराव भालेराव या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे धाराशिव जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर,गीताबाई चारठाणकर , विश्वनाथराव कातनेश्वरकर,भगीरथजी गेना,परसरामजी गेना,डॉ किशनराव चारठाणकर,रामचंद्र टाक, सोनाजीपंत कुलकर्णी,गो.बा.देशमुख,दिगंबर वैद्य,रामभाऊ टाक, तुळशीराम फोफसे,बाबुराव पवार,सदाशिवराव चौधरी,डॉ दिगंबरराव मुळावेकर,सखाराम खापरखुंटीकर,नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला . या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड,विश्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणागती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.त्यावेळी निजामाला मदत करणारी रझाकार संघटनेने जनतेवर अतोनात अत्याचार केले.रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांची सुद्धा लूट व्हायची.एकदा सेलू मधील पूर्ण मोंढा रझाकारांच्या माणसांनी लुटल्याची आठवण स्वातंत्रसैनिक भगीरथजी गेना यांनी सांगितली.
यासह असा भरपूर इतिहास मराठवाडा मुक्ती संग्रामचा आहे.परंतु दुर्दैवाने हा इतिहास आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचत नाही असे दिसते.शाळाशाळांमधून 17 सप्टेंबर ला प्रभातफेऱ्या निघायला पाहिजेत तसेच या दिवशी विविध व्याख्याने आयोजित करून इतिहासाची उजळणी केली तरच मराठवाडा मुक्ती संग्रामात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य पुढच्या पिढीला माहीत होईल नाही तर केवळ 17 सप्टेंबर या दिवशी ध्वजारोहण करून सुट्टीचा दिवस म्हणून समजत साजरा केला जाईल .
मराठवाडा मुक्ती संग्रामात मराठवाड्यातील परभणी जिल्हा हा केंद्रस्थानी होता.परभणी जिल्ह्यातून असंख्य स्वातंत्र्य सैनिक या लढ्यात सहभागी झाले होते.याची माहिती देखील विद्यार्थ्यांना द्यायला हवी.आणि परभणी जिल्ह्यात तरी प्रभातफेऱ्या शाळांमधून निघायला हव्यात.अर्थात याला राजकीय आणि शासकीय वर्तुळामधून आस्था निर्माण होऊन परिपत्रक काढायला हवे.करण परभणी जिल्ह्यात जे अधिकारी आहेत ते बहुतांश मराठवाड्याच्या बाहेरील आहेत.त्यामुळे त्यांना या बद्दल माहिती नसते.परंतु जिल्ह्यातील नेते,सामाजिक नेते यांनी या साठी जोर धरायला हवा.
Shabdraj www.shabdraj.com