१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” राबवले जाणार
सोनपेठ / प्रतिनिधी – महसूल प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सेवा पंधरवडा या उपक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामदिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण करत या उपक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश विटेकर यांनी केले.
यावेळी तहसीलदार सुनील कावरखे, नायब तहसीलदार देवेंद्रसिंह चंदेल, शिवाजी कराड, विठ्ठल सुर्यवंशी, मोहळा गावचे सरपंच सोमेश्वर जाधव, हनुमान जाधव तलाठी सुग्रीव प्रधाने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रामुख्याने हा सेवा पंधरवडा तीन टप्प्यांत राबवला जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात पांदन रस्त्यासंदर्भातील मोहिमेला प्रामुख्याने प्राधान्य दिले जाईल हा टप्पा दिनांक १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान राबवला जाणार आहे.
दुसऱ्या टप्यात ” सर्वांसाठी घरे” ही मोहीम राबविण्यात येणार असून हा टप्पा दिनांक २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान राबवला जाणार आहे.
तर तिसरा टप्पा हा २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत.
या सेवा पंधरवडा च्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील प्रामुख्याने पांदन रस्त्यासंदर्भातील मोहिमेला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी व शेतीमालाच्या वाहतुकीसाठी शेतरस्ता अत्यंत महत्त्वाचा असतो.
शेतरस्ता उपलब्ध करून देण्यासाठी यासाठी शासन कटिबद्ध असुन यासंदर्भात शेतरस्त्यांच्या निर्मितीसाठी विविध योजनांच्या निधिंचा समन्वय साधून समग्र योजना राबवली जाणार आहे. शिवाय शेतरस्त्यांच्या बाजूला वृक्षलागवड करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात ” सर्वांसाठी घरे” या उपक्रमांतर्गत जमिन वाटप अतिक्रमण नियमानुकुल करणेबाभतची कार्यवाही करण्यात येणार आहे.
राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे व सुरक्षित घर मिळाले पाहिजे यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्यसरकार देखील प्रयत्नशील आहे.
या अनुषंगाने सेवा पंधरवड्याच्या २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करण्यात येईल. या उपक्रमासाठी अस्तित्वातील रहिवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करण्यात येणार आहेत.
तीसऱ्या टप्प्यात स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार असल्याचे यावेळी तहसीलदार सुनील कावरखे यांनी सांगितले. राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या जन्मदिन व जयंतीचे औचित्य साधून त्या दरम्यानच्या काळात हे अभियान राबविले जाणार असल्याने याचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच नागरिकांना महसूल विभागाच्या सेवांचा लाभ जलदगतीने मिळवून देण्यासाठी यंत्रणेतील प्रत्येक घटक प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याने नागरिकांना या सेवा पंधरवडा उपक्रमाचा फायदा होईल असे आमदार राजेश विटेकर यांनी सांगितले.
यावेळी तहसील कार्यालयातील सगळे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोहळा गावचे सरपंच सोमेश्वर जाधव, हनुमान जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
Shabdraj www.shabdraj.com