-सेलूतील एक दिवस,एक पुस्तक अभिनव उपक्रम -अभिनव उपक्रमाचे पुष्प ३२ वे
सेलू / प्रतिनिधी – “मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ राजकीय स्वातंत्र्याचा नव्हता,तर तो खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा लढा होता. निजामशाहीच्या अन्यायी सत्तेविरुद्ध मराठवाड्यातील जनतेने प्राणपणाने संघर्ष केला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सैनिकांनी रझाकारांच्या दहशतीला तोंड दिले आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा लढा यशस्वीरीत्या पूर्ण झाला,” असे प्रतिपादन नूतन महाविद्यालयाचे प्रा. हनुमान व्हरगुळे यांनी केले. ते ‘एक दिवस – एक पुस्तक’ या उपक्रमातील चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नूतन कन्या प्रशालेचे सहशिक्षक डॉ. बाबासाहेब थोरे यांनी भूषविले.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालय, सेलू यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “एक दिवस – एक पुस्तक” या मासिक उपक्रमांतर्गत ३२ वे पुष्प कौस्तुभ दिवेगावकर लिखित “मराठवाडा १९४८ मुक्तिसंग्रामाचा समकालीन शोध” या ग्रंथावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. हरिती प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या ग्रंथात मराठवाडा मुक्ती संग्रामातील विविध पैलूंचा अभ्यासपूर्ण वेध घेण्यात आला आहे.
या प्रसंगी प्रा.हनुमान व्हरगुळे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास मांडला.स्वामी रामानंद तीर्थ,गोविंदभाई श्रॉफ, विनायकराव चारठाणकर,विठ्ठलराव शिंदे आदी स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान त्यांनी उलगडले. तसेच रझाकारांच्या दहशतीविरुद्ध झालेला सशस्त्र आणि अशस्त्र संघर्ष, ग्रामीण भागातील जनतेचा सहभाग,तसेच शेतकरी व कामगारांनी दिलेले योगदान यांचा सखोल आढावा त्यांनी घेतला.या चर्चेतून तरुण पिढीसमोर स्वातंत्र्यसंग्रामाचे प्रेरणादायी चित्र उभे राहिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले.सूत्रसंचालन संतोष बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळू बुधवंत यांनी केले. कार्यक्रमाला रघुनाथ देशमुख , संपतराव झोडगावकर,के.जी . कुलकर्णी,रमा बाहेती,जयंत नाईक,जी.ए.गुंजकर ,सिध्दार्थ वाघमारे,मोहन पाटील , पुनमचंद खौना,गौतम सुर्यवंशी,विठ्ठल साबळे यांच्यासह
साहित्यप्रेमी, शिक्षक,विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shabdraj www.shabdraj.com