04/02/26
Breaking News

सावधान …..गोदावरीने घेतली अनेक गावे कुशीत…एकाच बातमीत वाचा दिवसभरातील घडामोडी

परभणी,दि 23 ः
गोदावरी नदीवरील ढालेगांव बंधार्यातून मंगळवारी (दि.23) 3 लाख 81 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून मुळी येथील बंधार्यातून सुध्दा 2.75 लाख पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

मुळी/गंगाखेड येथून पुराचे हे पाणी वाहणार असून नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होणार असल्यामुळे मध्यरात्री 12 नंतर नदीकाठावरील गावांनी कमालीचे सतर्क रहावे, असे निर्देश लघु पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर लाटे यांनी दिले आहेत. पालम तालुक्यातील डिग्रस बंधार्यातून वाढीव पूर, पाण्याचा विसर्ग पुढे जाणार आहे.

..कसूर नदीला आलेल्या पुरामुळे सेलू-परभणी रस्ता वाहतुकीसाठी बंद..
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. परिणामी वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे. ढेंगळी पिंपळगाव परिसरातील पुलावरून कसूर नदीचे पाणी वाहू लागल्याने सेलू-परभणी हा महत्त्वाचा रस्ता वाहतुकीसाठी तत्काळ बंद करण्यात आला आहे.
….सोन्ना गावात पाणी….
…: सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातील सोन्ना परिसरात नदी-नाले दुधडी भरून वाहू लागले. परिणामी सोन्ना हे गाव पूर्णपणे पाण्याच्या विळख्यात सापडले असून गावाचा संपर्क तुटल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे
… गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पालन ते ताडकळस जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील धानोरा काळे पुलावर पाणी आल्याने हा पूल वाहतुकीसाठी तत्काळ बंद करण्यात आला आहे.

……50 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद…
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आजपर्यंतच्या अहवालानुसार परभणी जिल्ह्यातील एकूण 52 पैकी तब्बल 50 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. फक्त दोन मंडळे वगळता उर्वरित संपूर्ण जिल्हा पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. आजच्या (23 सप्टेंबर) स्थितीनुसार जिल्ह्यातील 22 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
यामध्ये पर्जन्यमान खालीलप्रमाणे नोंदविण्यात आले आहे –
परभणी तालुक्यातील झरी – 66.00 मि.मी., दैठणा – 69.00 मि.मी. गंगाखेड तालुक्यातील माखणी – 71.00 मि.मी., राणीसावरगाव – 66.50 मि.मी.,पिंपळदरी – 66.50 मि.मी., जिंतूर तालुक्यातील बोरी – 73.50 मि.मी.,चारठाणा – 71.50 मि.मी., दुधगाव – 68.00 मि.मी., पालम तालुक्यातील चाटोरी – 66.50 मि.मी., सेलु तालुक्यातील सेलू – 67.00 मि.मी., देऊळगाव – 67.00 मि.मी.,वालूर – 71.00 मि.मी., कुप्टा – 69.25 मि.मी., चिकलठाणा – 71.50 मि.मी., मोरेगाव – 74.75 मि.मी., सोनपेठ तालुक्यांतील आवलगाव – 71.50 मि.मी., शेळगाव – 89.00 मि.मी., वडगाव – 68.25 मि.मी., मानवत तालुक्यातील केकरजवळा – 69.25 मि.मी., कोल्हा – 66.25 मि.मी.,ताडबोरगाव – 68.75 मि.मी., रामपुरी – 95.50 मि.मी. या मंडळाचा समावेश आहे.
यामध्ये विशेषतः रामपुरी (95.50 मि.मी.) आणि शेळगाव (89.00 मि.मी.) येथे सर्वाधिक पर्जन्यमान नोंदले गेले असून, ही गावे अतिवृष्टीच्या गंभीर प्रभावाखाली आली आहेत.
जिल्ह्यातील बहुतेक तालुके व गावे सलग पावसाने बाधित झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके पाण्याखाली गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच काही ठिकाणी घरांचे व रस्त्यांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ मुंबई – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan …